मुंबई, दि. १९ : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत करून या रक्कमेचा धनादेश आज सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
सहकार मंत्री श्री.पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधी, कोविड – १९ या नावाने आर्थिक मदत करण्याबाबत सहकारी संस्थांना यापूर्वी आवाहन केले होते.
त्याला प्रतिसाद देत ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई यांनी ही मदत केली आहे. तसेच, सातारा जिल्ह्यासाठी ११ लाखांचे स्पेशल प्रोटेक्शन कीट आणि मोठ्या गावांना थर्मामिटर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
श्री.पाटील म्हणाले, राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची व्याप्ती विचारात घेता अशा नैसर्गिक आपत्ती प्रसंगी या सहकारी संस्थांने सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून मदत केली आहे ही कौतुकास्पद बाब आहे.
त्याबद्दल सोसायटीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले आणि सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून राज्यातील सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे सचिव चंद्रकांत ढमाळ, संचालक जिजाबा पवार, मुख्य व्यवस्थापक रामदास लिलीगे उपस्थित होते.