‘त्या’ मूकबधीर भगिनीला घरी पोहोचविण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्र्यांची धडपड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अमरावती, दि. 20 : जिल्हा रूग्णालयात दाखल एका मूकबधीर महिलेचे घर शोधून काढण्यासाठी आधार प्रणालीचा व आवश्यक त्या सर्व पर्यायांचा वापर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

या महिलेच्या व्यथेची दखल घेत श्रीमती ठाकूर यांनी आज इर्विन रुग्णालयाला भेट देऊन तिचे मूळ घर शोधण्याच्या प्रयत्नांना गती दिली. तिला सुरक्षित स्वगृही पोहोचविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील वलगाव येथून या मूकबधीर महिलेला ताप असल्याचे कारणावरून इर्विन रूग्णालयात 108 रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. तिची कोरोना तपासणीही करण्यात आली.

मात्र, ती कोरोनामुक्त असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. उपचारानंतर ही महिला घरी जाण्यायोग्य सामान्य वैद्यकीय स्थितीत आहे.

मात्र, तिला बोलता येत नसल्याने तिच्याशी संवाद होऊ शकत नाही आणि मग कुटुंबियांशी संपर्क कसा साधायचा, अशी अडचण वैद्यकीय यंत्रणेपुढे उभी राहिली.

ही अडचण सोडविण्यासाठी पालकमंत्री ॲड. ठाकूर या स्वत: तज्ज्ञांच्या चमूसह इर्विनमध्ये दाखल झाल्या. त्यांनी या महिलेची भेट घेतली व दिलासा दिला. यावेळी त्यांनी डॉक्टर व पारिचारिका यांच्याशी चर्चा करून निर्देश दिले.

मूकबधीर भगिनीच्या हातवाऱ्यांच्या आधारे सांकेतिक भाषा जाणकारांकडून तिचे मूळ ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, सदर महिलेचे फिंगर प्रिंट घेऊन ते आधार प्रणालीच्या डेटा तपासून त्या आधारे शोधून काढता येईल. त्यासाठी तात्काळ ही कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री ॲड. ठाकूर यांनी दिले.

या मूकबधीर भगिनीला तिच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधार प्रणाली तपासासह आवश्यक ते सर्व पर्याय वापरण्यात येतील. तिला तिच्या कुटुंबापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविले जाईल. आपण स्वत: या बाबीचा पाठपुरावा करत आहोत, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने वॉर्ड क्रमांक 9 मध्ये सदर महिलेला ठेवण्यात आले. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अधिपरिचारिका सिंधू खानंदे व इतर पारिचारिका तिची काळजी घेत आहेत.

यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयातील इतरही सुविधांचा आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सध्या डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांना अहोरात्र काम करावे लागत आहे.

मात्र, या संकटकाळातील आपली अविरत सेवा समाजहितासाठी अमूल्य योगदान देणारी आहे. आपण सर्वांनी खंबीर राहून एकजुटीने कोरोना संकटाचा मुकाबला करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

अहमदनगर लाईव्ह 24