सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 20 – अनेक गावांच्या कृती समितीमध्ये तलाठी हे सह अध्यक्ष आहेत. पण, हे तलाठी गावात उपलब्धच नसतात त्यामुळे तलाठी व ग्रामसेवक यांनी त्यांना नेमणूक दिलेल्या
गावांमध्येच वास्तव्यास असावे असे आदेश तहसिलदार यांनी काढावे अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयामध्ये सरपंच आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार प्रविण लोकरे, संदेश पारकर यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी व वेंगुर्ले तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.
सरपंच हे सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मुख्य आघाडीवर लढत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, सरपंचांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
प्रशासन आणि सरपंच यांच्यामध्ये योग्य तो समन्वय असणे गरजेचे आहे. त्यासाठीच आज जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत.
त्याची सुरुवात आज वेंगुर्ला येथून करण्यात आली आहे. सरपंचांनी त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्याविषयी तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांनीही सरपंचांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्यात अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बोलताना पालकमंत्री यांनी, तलाठी, ग्रामसेवक यांनी त्यांना ज्या गावात पदभार दिला आहे त्या गावात वास्तव्यास असावे असे आदेश तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी द्यावेत.
तलाठी यांनी त्यांचा जॉबचार्ट रोज सादर करावा, तसेच किमान दोन गावांना त्यांनी रोज भेट द्यावी, दोन पोलीस, नायब तहसिलदार आणि बीडीओ यांचा समावेश असणारे एक भरारी पथक निर्माण करावे.
या भरारी पथकाने अलगीकरणात असलेल्या ज्या व्यक्ती बाहेर फिरताना दिसतील त्यांना जागेवर अटक करावी. रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत जे लोक जिल्ह्याबाहेरून येत आहेत.
त्यांना तालुक्याच्या ठिकाणीच संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे, त्यासाठी वेंगुर्ला येथील म्हाडाची नव्याने झालेली इमारत तसेच नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या काही इमारती अधिग्रहित कराव्यात, विना पास, फक्त टोकन घेऊन कोणी जिल्ह्यात प्रवेश करत असेल तर त्यास जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
काही लोक दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा कंटेन्मेंट झोन बाहेरील पत्ता देऊन पास काढत आहेत व जिल्ह्यात येत आहेत. यावर नियंत्रण येण्यासाठी जिल्ह्यात प्रवेश करताना पास सोबतच पासधारकाचे आधार कार्डही तपासण्यात येणार आहे.
तसेच पास एकाच्या नावे व त्याच पासवर इतर व्यक्ती येत आहेत. असा प्रकारही होऊ नये यासाठी तपासणी करण्यात येत आहे. वायंगणी येथील कंटेन्मेंट झोन उठवण्यात आला याविषयीची माहिती सादर करण्यात यावी.
वायंगणी येथे सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णाविषयी सरपंचांनी तक्रार केली होती. या तक्रारीवर काय कार्यवाही केली अशी विचारणा केली. तसेच त्यास शिधापत्रिकाही देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिले.
यानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी कुडाळ येथे प्रशासन व सरपंच यांच्या समन्वयासाठी कुडाळ तहसिलदार कार्यालयामध्येही बैठक घेतली.
यावेळी आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार रविंद्र नाचणकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, संजय पडते यांच्यासह संबंधित अधिकारी व कुडाळ तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.