मुंबई : केंद्रीय सत्ताधारी भाजपा पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आर्थिक मंदीविषयी अनाहुत सल्ला दिला आहे. पंतप्रधानांनी कटू सत्य ऐकून घेण्याचा स्वभाव विकसित करावा तसेच आर्थिक मंदीतून बाहेर पडायचे असल्यास त्यांनी आपल्या सरकारमधील अर्थशास्त्रज्ञांना घाबरवणे सोडून द्यावे, असा सल्ला देखील त्यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.
स्वामी म्हणाले की, मोदी ज्या पद्धतीने सरकार चालवत आहेत त्या पद्धतीत फार कमी लोकच वैचारिक चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करू शकतील. मोदींनी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. तरच ते अधिकारी मोदींसमोर एखादी गोष्ट नाही करता येणार, अशी ठाम भूमिका घेऊ शकतील. मला वाटते मोदी अशा प्रकारची मानसिकता विकसित करू शकले नाहीत. देशाचा आर्थिक विकास सहा वर्षांतील नीचांकी ५ टक्के स्तरावर आला असताना सत्ताधारी पक्षाच्या एका खासदार आणि ज्येष्ठ नेत्याकडून ही टीका करण्यात आली आहे. सरकार मंदीतून बाहेर पडण्यासाठी परंपरागत व गैरपरंपरागत अशा हरप्रकारच्या उपाययोजना करत आहे. अलिकडेच सरकारने कॉर्पोरेट करात लक्षणीय घट जाहीर केली आहे.
स्वामींनी अर्थव्यवस्थेतील मंदीला नोटबंदी निर्णय जबाबदार ठरवला आहे. तसेच त्यांनी अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेच्या भूमिकांबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या दोन्ही संस्थांनी वास्तविक मुद्दे विचारात घेतले नाहीत तसेच निर्णय घेण्यापूर्वी पुरेशी तयारी देखील केली नाही, अशी टिप्पणी देखील त्यांनी केली. तसेच सरकारने जीएसटी कर व्यवस्था देखील अत्यंत घाईघाईने लागू केल्यामुळे देखील देशात मंदी आल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.