श्रीरामपुर: तालुक्यातील कमालपूर येथे दीपावली पाडव्याच्या दिवशी सायंकाळी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी ग्रामस्थ व युवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युवकांना बहुमोल मार्गदर्शन केले. तर पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धिर दिला.
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आलेल्या दिवाळी सणावर अवकाळी पावसाचे सावट होते. शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने कमालपूर मधील शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. सोयबीन, कापूस, बाजरी, मका यांसह अनेक पिके हातातोंडाशी आलेली असतानाच अवकाळी पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले.
या व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुरकुटे यांनी गावातील युवक तसेच शेतकरी वर्गाशी संवाद साधला. नोकरी व व्यावसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असणारे अनेकजण दिवाळीनिमीत्त गावी आलेले होते. त्यांच्याशीही विविध विषयांवर मुरकुटे यांनी चर्चा केली.