श्रीरामपूर : नवीन सरकार स्थापनेनंतर श्रीरामपूर जिल्हा कृती समितीतर्फे जिल्हा विभाजनासाठी योग्यवेळी आक्रमक पावले उचलली जाऊन जिल्हा विभाजन चळवळ यशस्वी होण्यावर सविस्तर विचारविनिमय करून श्रीरामपूरच जिल्हा होण्याचा निर्धार करण्यात आला आहे.श्रीरामपूर जिल्हा कृती समितीची बैठक नुकतीच समितीच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष प्रतापराव भोसले यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी कार्याध्यक्ष बाबासाहेब औताडे यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, प्रतापराजे भोसले, विलास थोरात, सुरेशराव ताके, नागेश सावंत, बाळासाहेब भोसले, भरत आसने, क्षितीज सुतावणे, दत्तात्रय बहिरट, प्रवीण लोढा, चंद्रकांत परदेशी, मुकेश गोहील, सोमनाथ परदेशी, भावेश ठक्कर, बाबासाहेब तरस, प्रमोद पत्की, विजय शिंदे, चंद्रकांत कपाळे, वैभव गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी लांडगे म्हणाले, जिल्हा विभाजन चळवळ व श्रीरामपूर जिल्हा निर्मितीच्या मागणीला पुन्हा एकदा सर्व ताकदीनिशी जोमाने पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सुमारे ४० वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला जिल्हा विभाजनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. मागील काही वर्षात देशात अनेक नवीन राज्यांची निर्मिती झाली.
महाराष्ट्रातसुद्धा अनेक नवीन जिल्हे तयार झाले. परंतु, प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत गरजेचे असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी प्रलंबितच राहिला. तसेच जिल्ह्यात दक्षिणेकडील विकासकामात प्रत्येक वेळेस उत्तरेकडील नेत्यांचा राजकारणात वर्चस्व असल्याने अन्याय होतो, अशी ओरड दक्षिणेकडील नेते व जनता सतत करत असतात. त्यामुळे जिल्हा विभाजनाची खरी निकड आता ही दक्षिणेकडील जनतेलाच आहे. हे ओळखून कृती समितीने आता या प्रश्नावर दक्षिणेकडील नेत्यांकडून आवाज उठविला पाहिजे. यासाठी नुकतीच माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी व भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांची भेट घेतली.
या भेटीत दोन्ही नेत्यांनी जिल्हा विभाजनाची मागणी अतिशय रास्त असल्याचे सांगत श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या कार्याला पूर्ण पाठिंबा दर्शविला. भविष्यात या प्रश्नासाठी गरज पडली, तर दक्षिणेतील जनतेच्या न्यायासाठी रस्त्यावर येऊ. प्रत्यक्षात संघर्ष करण्याची आपली तयारी आहे, असे ते म्हणाले.