मुंबई दि.२०- कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत असलेल्या खाजगी दवाखान्यातील ८०% बेड नव्वद दिवसासाठी ताब्यात घेतले असून त्याचा कोविड, नॉन कोविड अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी उपयोग केला जाणार आहे.
उर्वरित २० टक्के बेड हे हॉस्पिटलला त्यांच्या इतर रुग्णांसाठी ठेवण्यात आलेले आहेत. अशा प्रकारची व्यवस्था कित्येक वर्षात प्रथमच करण्यात आली असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे महापालिकेतर्फे मुंबईतील लोकांसाठी एक डॅशबोर्ड तयार करण्यात आला असून त्याद्वारे मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयासहित सर्व रुग्णालयाची माहिती, तेथे रिक्त असलेल्या बेडची माहिती कळणार आहे.
याकरिता १९१६ या कंट्रोल रूमच्या नंबरवर फोन केल्यास नागरिकांना ही माहिती कळेल. कंट्रोल रुममध्ये दहा डॉक्टरांचे पथक उपस्थित राहील.
ते परिस्थितीनुसार निर्णय घेऊन कोणत्या हॉस्पिटलला जावयाचे याची संबंधिताना सूचना करतील. तसेच दहा ते पंधरा मिनिटात त्या ठिकाणी रुग्णवाहिकादेखील उपलब्ध होऊ शकेल.
महानगरपालिकेने २५० नवीन ॲम्बुलन्स रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून आता महानगरपालिकेकडे एकूण ३३० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.
५० बेस्ट बसेस, २०० इनोव्हा-टाटा सुमो गाड्यांमध्ये बदल करून त्यात रुग्णवाहिकेसारखी सुविधा केली आहे. केवळ दहा ते पंधरा मिनिटात आता मुंबईकरांना रुग्णवाहिका उपलब्ध होईल.
एमएमआरडीए, नेस्को, एनएससी डोम येथे तात्पुरत्या सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी
एम.एम.आर.डी.ए.ने बांद्रा येथे १ हजार खाटांचे मोठे हॉस्पिटल उभे केले असून नुकतीच त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून ५० डॉक्टरांचे पथक आलेले आहे.
त्यांची व्यवस्था देखील बाजूला ट्रायडंट हॉटेलमध्ये केली आहे. याजवळील एशियन हार्ट हॉस्पिटलने आयसीयुची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे.
केवळ चार पाच मिनिटाच्या आत गरज भासल्यास रुग्णाला एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करता येऊ शकेल. फेज २ मध्ये आणखी हजार खाटांची व्यवस्था याठिकाणी करण्यात येईल.तसेच नेस्को, गोरेगाव येथे १ हजार खाटांचे रुग्णालय तयार असून आयसीयुची व्यवस्था त्याजवळील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात करण्यात आली आहे.
वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोम मध्ये ५०० खाटांचे व ५० खाटांचे आयसीयू असलेले हॉस्पिटल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून उभे केले असून ते ३१ मे पर्यंत तयार होत आहे .
त्यासोबतच रेस कोर्स पार्किंगमध्ये ८०० खाटांचे रुग्णालय जूनअखेरपर्यंत तयार होईल. याखेरीज मुलुंड नाका येथे १ हजार व दहिसर नाका येथे १ हजार खाटांचे हॉस्पिटल पुढील काही दिवसात तयार होत आहे.
त्यामुळे रूग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर बेड उपलब्ध होतील, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.
राज्यात रुग्णांची संख्या जरी जास्त दिसत असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत ती कमी आहे. महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा विचार केल्यास ही रुग्णांची संख्या ०.०१२५ एवढी आहे. ही बाब देखील महत्वाचे असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
कमी शुल्कात डायलिसिसची सुविधा देण्याचा मनपाचा प्रयत्न
मुंबईत जवळपास दहा हजार रुग्णांना डायलिसिसची गरज आहे. याचा विचार करून महानगरपालिकेने डॉ. श्रीरंग बिचू यांच्याशी करार करुन कमी शुल्कामध्ये ही सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.
परराज्यातील जवळपास पाच लाख कामगार आपापल्या राज्यात विशेष श्रमिक ट्रेन द्वारे रवाना
परराज्यातील कामगार, मजुरांना महाराष्ट्रात जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करून परवानगी मिळताच त्यांना त्यांच्या मुळ राज्यात पाठवण्यात आले आहे.
३२० विशेष श्रमिक ट्रेन द्वारे ४ लाख २६ हजार मजूर, कामगार आपापल्या राज्यात आतापर्यंत गेले आहेत. महाराष्ट्रात चांगली सुविधा मिळाल्याचे त्यांनी तेथे गेल्यावर सांगितले तसेच त्यांना पाठवण्यात आलेल्या ट्रेनचे तिकीट शुल्कही राज्य सरकारने भरले आहे.
परराज्यात गेलेल्या मजूर, कामगारांनी महाराष्ट्रात मिळालेल्या सुविधांची भरभरून तारीफ केली. त्यांना त्यांच्या राज्यातही तशा सुविधा मिळत नाहीत, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले असल्याचे दूरचित्रवाहिन्यांवर दिसले. असे श्री.पाटील म्हणाले
२ लक्ष खाजगी वाहनांद्वारे ८ लक्ष लोक राज्याच्या सीमा बाहेर
१ लक्ष ६५ हजार स्थलांतरित मजुरांना एसटी बस द्वारे त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडले
परराज्यातील हजारो लोक रस्त्याने पायी चालत आपल्या राज्यात चालले होते. अशा १ लाख ६५ हजार ८९० लोकांना एसटी महामंडळाच्या १३,६५५बसेस द्वारे त्यांच्या-त्यांच्या राज्याच्या सीमां पर्यंत नेऊन सोडले.
तसेच परवानगी घेऊन खाजगी २ लाख वाहनांद्वारे८ लाख लोक राज्याच्या सीमा बाहेर गेले आहेत. पश्चिम रेल्वेला वारंवार लेखी, व्ही.सी. द्वारे परवानगी मागूनही त्यांनी केवळ अठरा गाड्या महाराष्ट्राला दिल्या. अशा विविध अडचणी येत असूनही त्यावर राज्यसरकार मात करत आहे.
केंद्र शासनाने राज्याच्या हक्काचे ११हजार कोटी तातडीने द्यावेत
केंद्र शासनाने राज्य शासनाचे हक्काचे ११ हजार कोटी रुपये तातडीने द्यावेत अशी मागणी श्री. पाटील यांनी यावेळी केली.
ग्रीन झोन मधील सर्व उद्योग हळूहळू सुरु
ग्रीन झोनमधील उद्योग हळूहळू सुरू होत आहेत. ग्रीन झोन मधील सर्व उद्योग लवकरात लवकर सुरू होतील यासाठी शासन प्रयत्न करीत आहे असे त्यांनी सांगितले.
कोरोना संकटाशी मुकाबला करण्यास कसलेही राजकारण न करता सर्वांनी एकत्र यावे. ज्या चांगल्या सूचना आहेत, त्याचे स्वागत राज्य शासन नेहमीच करते. या संकटावर मात करण्यासाठी समाजाच्या सर्वच घटकांसोबत विचार विनिमय, चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी चित्रपट कलावंतांसोबत आजच संवाद साधला असल्याची माहिती त्यांनी दिली.कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी सर्व लोकांच्या सहभागाची नितांत आवश्यकता आहे. सर्वांनी नियमांचे पालन करावे. सोशल डिस्टेन्सिंग चे पालन करावे. लोकांचा सहभाग आणि लोक चळवळीने हा लढा आपण निश्चित जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.