ग्रामीण भागातील जनतेने मनरेगाच्या रोजंदारीचा लाभ घ्यावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि. 21 : टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने संपूर्ण राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्याचे नियोजन केले असून

शेतकरी , शेतमजूर व ग्रामीण जनतेने  शासनाच्या योजनेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन रोजगार हमी योजना मंत्री संदिपानराव भुमरे यांनी केले आहे.

शासनाने सोशल डिस्टन्सिंग विषयक निर्देशांचे पालन करत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यामुळे जलसंधारण, सिंचन विहिरी, पशुंसाठी गोठ्याचे बांधकाम, फलोत्पादन आदी वैयक्तिक स्वरुपाच्या कामांसोबतच शेतीला जोडणारे रस्ते, जलसंधारण, नाला सरळीकरण, सामूहिक विहिरी, वृक्षारोपणाची पूर्वतयारी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे सुलभ होणार असल्याचे मंत्री श्री. भुमरे यांनी सांगितले.

राज्यातील सर्व गावात गावनिहाय मंजूर करण्यात आलेल्या कामांचे नियोजन करून त्यानुसार प्रत्यक्ष कामे सुरू करण्याच्या  सूचना जिल्हास्तरावर रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

लाभार्थ्यांनी काही समस्या आली असेल तर आयुक्त (मनरेगा), सचिव (रोहयो) किंवा व्यक्तिशः संपर्क साधावा, असेही मंत्री भुमरे यांनी सांगितले.

कामाच्या ठिकाणी खबरदारी घ्यावी

श्री. भुमरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाच्या ठिकाणी प्रत्येकाने मास्क वापरावे, सामाजिक अंतराचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा. हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. सर्दी, ताप, खोकला अशी काही लक्षणे दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरकडे जावे. याबाबत दक्ष राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24