गोंदियात ‘माविम’च्या महिलांकडून जनजागृती, मास्क निर्मिती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. जगातील अनेक विकसित आणि प्रगत देशातील नागरिक या विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहे. बाधित होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे .आपल्या देशात आणि राज्यातदेखील या विषाणूची बाधा पोहोचली आहे. आजवर या विषाणूवर लस उपलब्ध झालेली नाही.

या विषाणूची संसर्ग साखळी तोडणे हाच यावरचा सध्याचा उपाय आहे. गोंदियासारख्या दुर्गम, मागास,आदिवासीबहुल, नक्षलदृष्ट्या संवेदनशील आणि राज्याच्या टोकावर असलेल्या जिल्ह्यात कोणताही नागरिक हा या विषाणूने बाधित होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन आरोग्य विभागासह विविध यंत्रणांना सोबत घेऊन काम करीत आहे.

Maha Info Corona Website जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित ग्रामीण आणि शहरी भागातील बचतगटांच्या महिला कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला साथ देण्यासाठी उतरल्या आहेत. माविमच्या ह्या महिला गावोगावी पोस्टर्सच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जनजागृतीचा संदेश देत आहे.

या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोगात येणाऱ्या कापडी मास्कची निर्मिती करीत आहे. तर बँकेत अनुदानाची रक्कम काढण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण लाभार्थ्यांची बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी त्या लाभार्थ्यांना घरपोच अनुदानाची रक्कम बँक करस्पाँडंट या नात्याने ह्या महिला काम करीत आहे.

माविमच्या बचतगटातील महिला ह्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गावोगावी पोस्टर्सवर संदेश लिहून जनजागृती करीत आहे. पोस्टर्सवर लिहिलेल्या घरीच राहा ,सुरक्षित राहा, खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा मास्कचा वापर करा, शासनाच्या आदेशाचे पालन करा,वेळोवेळी हात स्वच्छ धुवा अनावश्यक घराबाहेर पडू नका,

गर्दी करू नका असे संदेश या महिला सामाजिक अंतर ठेवून आणि नाक व तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून गावात घरोघरी देत असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जागृती होत असून लोक दक्षता घेऊ लागले आहे.कोरोना विषाणूचे गांभीर्य लोकांना त्यांच्या संदेशातून होऊ लागल्याने त्याबाबतचे प्रत्यक्ष आचरणदेखील लोक करू लागले आहेत.

बचतगटातील महिला कोरोनविषयी जनजागृती करू लागल्याने प्रशासन आणि आरोग्य विभागाला या महिलांची मदत होऊ लागली आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यास बचत गटातील महिलांनी पुढाकार तर घेतला आहेच.यापुढेही जाऊन त्यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नाक आणि तोंड झाकण्यासाठी वापरण्यात येणारे कापडी मास्क तयार करून विक्री देखील केली आहे.

माविमच्या गोंदिया येथील उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या कापडी पिशवी उद्योग निर्मिती केंद्रामध्ये ग्रामीण व शहरी भागातील बचतगटांच्या महिला आधुनिक शिलाई मशीनवर कापडी मास्क तयार करीत आहे. आतापर्यंत या महिलांनी 21600 मास्क तयार करून त्याची विक्री देखील केली आहे. मास्क निर्मितीतून या महिलांना रोजगाराचे एक साधन उपलब्ध झाले आहे.जिल्ह्यात कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मास्क निर्मिती करून महिलांनी आपले योगदान दिले आहे .

गर्दी टाळणे आणि सामाजिक अंतर ठेवणे हा सुद्धा कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनेचा एक भाग आहे.अनेक योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक आहे अशा लाभार्थ्यांना माविमच्या 52 बँक करस्पाँडंट महिला ह्या त्यांच्याजवळ असलेल्या मायक्रो एटीएमच्या माध्यमातून घरबसल्या

प्रधानमंत्री जनधन योजना, शेतकरी सन्मान योजना, उज्वला गॅस योजना, संजय गांधी निराधार योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यासह अनेक अन्य योजनांचे अनुदान किंवा मजुरीची रोख रक्कम घरबसल्या लाभार्थ्यांना देत असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्याची बँकेतुन पैसे काढण्यासाठी होणारी पायपीट तर थांबली आहेच सोबतच कोरोना विषाणूच्या संसर्गापासून विविध योजनेच्या लाभार्थ्याचा बचाव करण्यास माविमच्या बँक करस्पाँडंट मदत होत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील माविमच्या 6028 बचतगटातील हजारो महिला या विषाणूचा जिल्ह्यात संसर्ग रोखण्यासाठी पुढाकार घेत आहे.पोस्टर्सवरील संदेशाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे.कापड मास्क तयार करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यास महिलांचा प्रत्यक्ष हातभार लागत आहे.

लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांची अनुदानासाठी बँकेत येण्याची पायपीट थांबवून कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लाभार्थ्यांना घरीच बायोमेट्रिक पध्दतीचा वापर करुन मायक्रो एटीएममधून अनुदानाची रोख रक्कम उपलब्ध होत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या लढाईत माविमच्या बचतगटातील महिला देखील आपले योगदान देत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24