अमरावती, दि. 22 : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आदिवासी विभागाच्या सर्व आश्रमशाळा बंद आहेत.
शैक्षणिक कालावधी पूर्ण झालेला नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने ‘छुट्टियों का मजा’ ही कार्यपुस्तिका तयार केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.
सध्या राज्यातील विविध प्रकल्प कार्यालयातर्फे ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. हाच प्रयोग धारणी प्रकल्पामध्ये राबविण्यात येत होता.
मात्र मेळघाटातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. बहुतांश गावात आवश्यक असणारी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही.
त्यामुळे या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, यासाठी कार्यपुस्तिकेचा उपक्रम हाती घेण्यात आला. प्रकल्प अधिकारी डॉ.मिताली सेठी यांच्या निर्देशानुसार ग्रामीण वातावरणाशी सुसंगत अशी ‘छुट्टियों का मजा’ ही कार्यपुस्तिका मुर्तरूपात आकारास आली.
या कार्यपुस्तिकेची छपाई झाल्यानंतर 18 मे 2020 पासून वितरीत करण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत येत असलेल्या 20 शासकीय आश्रमशाळेतील सुमारे साडेसहा हजार विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन परस्पर अंतर ठेवून या कार्यपुस्तिका पोहोचविण्यात येत आहे.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना नियमित मास्क वापरणे आणि वारंवार हात धुण्याचे महत्त्व पटवून सांगण्यात येत आहे. या कार्यपुस्तिका पाहून विद्यार्थ्यांनी आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या.
ही कार्यपुस्तिका केवळ धारणी प्रकल्प कार्यालयांतर्गत मर्यादित न ठेवता, या कार्यपुस्तिकेचे स्वरूप व्यापक केले आहे.
कार्यपुस्तिकेची “https://drive.google.com/drive/u/0/folders/1vUS4NutHV6IWCRhiXOQuMDcTGm6_U-Gj” ही लिंक सार्वत्रिक करण्यात आली आहे.
या लिंक आधारे कार्यपुस्तिका डाऊनलोड करून त्याचा अभ्यास करता येऊ शकतो. तसेच शैक्षणिक संस्था कार्यपुस्तिकेची छपाई करून विद्यार्थ्यांना वाटप करू शकतात.
या उपक्रमास आदिवासी विकास मंत्री डॉ. के. सी. पाडवी, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, आयुक्त किरण कुलकर्णी,
अमरावतीचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी पाठींबा देऊन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यासह प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.
कार्यपुस्तिका हाताळताना विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी नियोजन अधिकारी तथा सहायक प्रकल्प अधिकारी विनोद धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ शिक्षकांचे दोन व्हॉटस् ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहे.
यात विद्यार्थ्यांना आलेल्या समस्या शिक्षकांसाबत चर्चा करून या समस्यांचे निराकरण करण्यात येतील, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सांगितले.