राज्यात ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई,  दि. २३  :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या दि.१९ एप्रिल २०२० पर्यंत राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

तसेच स्वस्त धान्य दुकानांमध्ये काळा बाजार, वाटप करताना कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यातील सहा महसुली विभागात लॉकडाऊनच्या काळात एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.

राज्यातील या वितरण व्यवस्थेवर अन्न,नागरी पुरवठा विभागाच्या वतीने काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात आले असून निर्माण करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे.

नागपूर विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून १८ रेशन दुकानांचे निलंबन तर एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ११ दुकानांवर निलंबित करण्याची कारवाई तर वर्धा जिल्ह्यात ४ दुकानांवर कार्यवाही झालेली आहे.

रेशन दुकान रद्द केल्याची कारवाई नागपूर शहर भागात करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अमरावती विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३ दुकानांवर निलंबित करण्याची कार्यवाही झालेली असून वाशीम जिल्ह्यात ५ दुकानांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात ४ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी २ गुन्हे अमरावती व अकोला जिल्ह्यात दाखल करण्यात आले असून बुलढाणा जिल्ह्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद विभागात २९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून ४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक १२ रेशन दुकानांवर तर उस्मानाबाद जिल्हात ५ रेशन दुकानांवर निलंबनाची कार्यवाही झालेली आहे. तसेच जालना आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी २ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.

नाशिक विभागात एकूण १६ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १५ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ३ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात ७ तर नाशिक जिल्ह्यात ४ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी ७ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पुणे विभागात एकूण ४ गुन्हे नोंदविण्यात आले असून १७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून १४ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ११ दुकानांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात ८ रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले असून पुणे जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोकण विभागात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर एका दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात ४ रेशन दुकाने निलंबित करण्यात आले रत्नागिरी जिल्ह्यात एका रेशन दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ४ गुन्हे तर रायगड जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24