झेंडे बदलले, पण तेच नेते एकमेकांविरुद्ध !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले तरी अद्यापही नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झालेले नाही. आघाडी झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा काही सुटला नाही तर दुसरीकडे जागा वाटपावरूनच युतीचे घोडे अडले आहे.

त्यामुळे शिलेदार कोण हे काही चित्र स्पष्ट झाले नाही. भाजप व शिवसेनेतील इनकमिंगमुळे झेंडे बदलले असले तरी चेहरे तेच आहेत. परिणामी गेल्या काही निवडणुकीतील शिलेदार याही निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार रिंगणात उतरणार असून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे या दोन्ही नेत्यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल, ते अनुत्तरित आहे.

अर्थात या दोन्ही मतदारसंघात उमेदवार कोणीही असला तरी लढत मात्र थोरात व विखे यांच्यात होईल. त्यामुळे शिंदे, थोरात व विखे यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे.

ज्या पद्धतीने आघाडीतील नेत्यांनी विकासाच्या मुद्‌द्‌यावर भाजप व शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे निष्ठावंतांच्या पदरी पुन्हा सतरंज्या उचलणेच आल्याने निष्ठावंत वैतागले आहेत. त्यामुळे आता भाजप व शिवसेनेतून गयारामांना सुरवात होण्याची शक्‍यता आहे.

डाव्या विचारांचा जिल्हा कॉंग्रेसमध्ये झाला. त्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेला जिल्हा काही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भगवा होत गेला असून आज किमान आठ विधानसभा मतदारसंघाचे भगवेकरण झाले आहे.

जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र प्रत्यक्षरित्या स्पष्ट नसले तरी शिलेदार मात्र कोण असणार हे पक्‍क आहे. पक्षांतरामुळे झेंडे बदलले पण चेहरेमात्र तेच आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24