रमजाननिमित्त गृहमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांनी दिल्या शुभेच्छा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि.२४: कोरोना विषाणूविरुद्ध आपण सर्वजण लढा देत आहोत. या लढाईत विजयी होण्यासाठी लॉकडाऊन काळात नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. रमजानचा पवित्र महिना सुरु होत आहे.

त्यानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पवित्र महिन्यात मशिदीत अजान होईल, मात्र मशिदीत अथवा रस्त्यावर एकत्र येऊन नमाज पठण न करता ते घरातच करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

गृहमंत्री म्हणाले, आपणा सर्वांना हे माहित आहे की, कोरोना सारखा विषाणू हा जात, धर्म, पंथ, लिंग, गरिबी, श्रीमंती काहीही पाहत नाही. कोरोना बाधित एका व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कित्येक व्यक्ती बाधित होऊ शकतात. अनेक व्यक्ती एकत्र आल्यास कोरोना वाढण्याचा धोका होऊ शकतो. कृपया याची सर्व बांधवांनी खबरदारी घ्यावी.

कोणतेही धार्मिक सण, उत्सव, सार्वजनिक रितीने साजरे करण्यास या लॉकडाऊनच्या काळात मनाई आहे. त्यामुळे रमजानच्या काळातही कोरोना प्रतिबंधक नियम, निर्देशांचे काटेकोर पालन करावे.

ईफ्तार पार्टीचे सार्वजनिक आयोजन करू नये. आपणच आपली स्वतःची आपल्या कुटुंबाची व पर्यायाने समाजाची काळजी घ्यावी. ही कोरोनाविरुद्धची लढाई लढायची व जिंकायची आहे, असे  आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24