डाकिया ‘जन’ धन लाया…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नंदुरबार, दि.25 : ‘बडे डाक खाने से आता लाता कभी रुपैया, कभी किताबें दे जाता है मुझ को हँस हँस भैया’….बालपणीच्या कवितेतील मुन्शीराम डाकियाचे वर्णन आठवण्याचे कारण म्हणजे आजच्या ‘डाकिया’ने संचारबंदीच्या काळात ग्रामीण जनतेला दिलेला दिलासा.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून पोस्टाचे प्रतिनिधी गावात जावून पैसे वाटप करीत असून आठवड्याभरात 2392 खातेदारांना 32 लाख 72 हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. डाक सेवेच्या उपयुक्तता तंत्रज्ञान युगात कमी होते की काय अशी शंका वाटत असताना या विभागाने कात टाकून नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.

नव्या सेवांचा समोवश आपल्या कामकाजात करून वेळोवेळी आपली उपयुक्ततादेखील सिद्ध केली आहे. कोरोनाच्या संकटवेळी बँकेतील गर्दी टाळणे आवश्यक असताना इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने गावपातळीवर आपले काम नेऊन नागरिकांना चांगली सेवा दिली आहे.

केवळ आधार कार्ड आणि मोबाईल जवळ असला तरी नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना किंवा अन्य योजनेच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यात जमा झालेली रक्कम काढता येत आहे. इतर सार्वजनिक बँकांमधील रक्क्कमदेखील काढण्याची सुविधा गावपातळीवर उपलब्ध झाली आहे.

या सुविधेसोबत सार्वजनिक बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राच्या 170 प्रतिनिधींमार्फतदेखील गावपातळीवर रक्कम काढण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत 54 हजार 958 खात्यातील 4 कोटी 35 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखेतून प्रतिनिधी परिसरातील 3 ते 4 गावात जाऊन ही सुविधा देतात. एकावेळी 1000 रुपये काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक प्रतिनिधी एका दिवसात 25 हजार रुपयांचे वितरण करू शकतो. गावात अधिक ग्राहक असल्यास सर्व ग्राहकांना पैसे वितरीत होईपर्यंत गावात ही सुविधा दिली जाते.

त्यामुळे शहरात बँकेतील गर्दी कमी होण्याबरोबर नागरिकांचा त्रासदेखील वाचला आहे. विशेषत: गरजू महिला आणि वृद्धांना या सुविधेचा चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे गावात पूर्वीसारखी ‘डाकिया’ची वाट पाहिली जात आहे. प्रशांत सोनवणे, प्रतिनिधी – म्हातारी माणसे बँकेत जाऊ शकत नाहीत.

त्यांचा त्रास आपल्या सेवेमुळे वाचत असल्याचे समाधान मिळते. त्यांना खरी गरज आहे. शासन आपल्याला मदत करते आहे याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर पाहता येतो. सुधाकर जाधव, प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे बँकेपर्यंत नागरिकांना जाता येत नाही. त्यामुळे गावात जाऊन पैसे दिल्यावर त्यांना समाधान वाटते. त्यांचे आपुलकीचे दोन शब्द उत्साह वाढविणारे असतात.

अहमदनगर लाईव्ह 24