मुंबई दि. २५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २९४ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये २९४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, त्यापैकी १३ गुन्हे अदखलपात्र (एन.सी) आहेत.
त्यामध्ये बीड २८, पुणे ग्रामीण २३, मुंबई २०, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १२, नाशिक शहर ११, नाशिक ग्रामीण १०, बुलडाणा १०, जालना ९, लातूर ९, सातारा ९, नांदेड ९, परभणी ७, सिंधुदूर्ग ७, ठाणे शहर ७, नवी मुंबई ७, ठाणे ग्रामीण ६,
हिंगोली ६, नागपूर शहर ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, रत्नागिरी ४, भंडारा ३, सोलापूर शहर ३, चंद्रपूर ३, रायगड २, धुळे २, वाशिम २, पिंपरी- चिंचवड १, औरंगाबाद १ (एन.सी) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने विश्लेषण केले. या विश्लेषणानूसार आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १२२ तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १०७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ९ गुन्हे व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत.
तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब ) गैरवापर केल्या प्रकरणी ४७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ७७ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी ३६ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहेत.
सातारा जिल्ह्यातील कराड पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ९ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक अकाऊंट वरून कोरोना महामारीच्या संदर्भात चुकीची माहिती देणाऱ्या पोस्ट्स टाकून व तसेच आपल्या मोबाईल क्रमांकावरून
व्हाट्सॲप ग्रुपवर कोरोना महामारीच्या संदर्भात चुकीची माहिती देणारे मेसेजेस फॉरवर्ड केले होते, त्यामुळे परिसरात भीती पसरून व शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.
पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यांतर्गत घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद झाली आहे, पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या २३ वर गेली आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाइलद्वारे कोरोना महामारीच्या काळात सुरु असलेल्या सरकारी मदतीबद्दल चुकीच्या माहितीची पोस्ट टाकली ज्यामुळे परिसरातील लोकांच्या मनात चालू असलेल्या सरकारी उपाययोजनांबद्दल संभ्रम निर्माण होऊन सरकारची प्रतिमा मालिन होऊ शकली असती.
सध्या लॉकडाऊन कधी संपणार याबाबत सर्व सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट्स व मेसेजेस फिरत आहेत.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, कृपया अशा मेसेजेस व पोस्ट्सवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जर असा काही मजकूर फॉरवर्ड करून आला असेल तर त्याची केंद्र सरकार व राज्य सरकारकडून वेळोवळी ज्या नियमावली व आदेश काढतात त्याच्या बरोबर खात्री करून घ्या.
जर फॉरवर्ड करून आलेला मेसेज किंवा पोस्ट चुकीची असेल तर तुम्ही ती पुढे पाठवून, अफवा पसरवू नका अन्यथा तुमच्यावर पण कायदेशीर कारवाई होऊ शकते. कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.