जनतेच्या हितासाठी सत्ता राबविणार- आमदार शंकरराव गडाख

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सोनई : विरोधकांनी सत्तेच्या माध्यमातून राजकीय सुडबुद्धीने दिलेला त्रास मी विसरलो आहे. आपली राजकीय ताकद विरोधकांची जिरविण्यासाठी अजिबात खर्ची घालणार नसून जनतेच्या हितासाठी राबविणार असल्याचा दृढ संकल्प नवनिर्वाचित आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला.

विजयी घोषित झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडाख यांनी वरील भावना व्यक्त केली. विजयानंतर त्यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन भास्करगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा ३० हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केल्याचे जाहीर झाल्यानंतर मतमोजणी केंद्र परिसरात उपस्थित पत्रकारांनी त्यांच्याशी बातचीत केली.

गेल्या पाच वर्षांत राजकीय सुडबुद्धीतून झालेला प्रचंड त्रास, मानहानी याचे पुरेपूर उट्टे काढले जाईल का?

असा पत्रकारांचा प्रश्नांचा असलेला रोख ओळखून गडाख यांनी दणदणीत विजयाबाबत प्रतिक्रिया देताना आपल्यातील राजकीय परिपक्वतेचे तसेच ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सुसंस्काराचे दर्शन घडवले.

आमदार गडाख म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षात मला व माझ्या कुटुंबियांना राजकीय सुडबुद्धीतून झालेला त्रास मी विसरलो आहे. कार्यकर्त्यांनीही हे विसरावे, असे मी आवाहन करतो.

सर्वसामान्य जनतेने दिलेला हा विजय असल्याने हे जनतेचे सत्तास्थान आहे, याची जाणीव मला आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे व जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडविण्याला आपण यापुढील काळात प्राधान्य देणार आहोत.

राजकीय सत्तेचा जनतेलाच फायदा मिळावा यासाठी दक्ष राहणार असून, तालुक्यातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेऊनच सर्व निर्णय घेणार आहोत.

सरकारात सहभागी होण्याची संधी आल्यास आपण स्वत:साठी काहीही मागणार नसून नेवासा तालुक्याचे कल्याण हे ब्रीद अग्रणी ठेवूनच राज्य पातळीवर कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा राजकीय पातळीवर कोणाबरोबर जायचे याचा निर्णय भविष्यात घेऊ, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24