कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सोलापूर, दि. २६ : सोलापुरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याबरोबरच कोरोनाने बाधित रुग्ण बरे होण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिल्या.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

सोलापुरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व्हेक्षणातून कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांच्या तत्काळ चाचणी करा. चाचण्यांची संख्या वाढवा,.

सर्वेक्षणात माहिती न देणाऱ्य किंवा माहिती लपवणाऱ्या नागरिकांच्यावर गरज भासल्यास पोलीस कारवाई करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी उपाययोजना करीत असतानाच त्यांना अत्यावश्यक सेवा घरपोच मिळतील, यासाठी महापालिकेने नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

कोरोना बाधितांबरोबरच इतर रोगांने आजारी असणाऱ्यांवर उपचार करण्यात यावेत. त्यामध्ये अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्या. खासगी दवाखाने सुरू राहतील, यासाठी वैद्यकीय संघटनांची मदत घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या.

डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, कोरोना विषाणूच्या विरूद्ध काम करीत असणारे विविध विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांची काळजी घ्यायला हवी.

सर्वेक्षण करणारी कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना पीपीई किट, मास्क, फेस शिल्ड पुरवा, असे त्यांनी सांगितले.

सोलापूर शहरात सुरु असणारे सर्व्हेक्षण वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण केले जावे. या सर्व्हेक्षणात ताप, सर्दी आणि कोरडा खोकला असणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा विकसित करा, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

जिल्ह्यात विविध ठिकाणी असणाऱ्या निवारा शिबीरात स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात याव्यात. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जावी, असेही त्यांनी सांगितले.

केशरी कार्ड धारकांना धान्य वाटप सुरू करा. त्याचबरोबर  अंत्योदय आणि कुटुंब प्राधान्य क्रम योजनेतील लाभार्थ्यांना धान्यांचे आणि मोफत तांदळाचे वितरण करा, असे त्यांनी सांगितले.

मात्र धान्य वितरण करताना दुकानांत गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.  प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच धान्य पोहचवता येतील का, याबाबत प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, पोलीस निरीक्षक संजय जगताप आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे यांनी दिलेल्या सूचना –

· कोरोना बाधित रुग्णांवर आधिक लक्ष द्या.

· ट्रेसिंग आणि टेस्टिंग वाढवा.

· कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड हॉस्पिटल सज्ज ठेवा.

· रूग्णवाहिका सज्ज ठेवा, आवश्यकता भासवल्यास अधिग्रहीत करा.

· खासगी डॉक्टरांची सेवा घ्या. सेवेस नकार दिल्यास कारवाई करा.

·  धान्याचे वितरण व्यवस्थित होईस, याकडे लक्ष द्या.

· शेती विषयक कामांकडे लक्ष द्या. बी-बियाणे, खते यांची उपलब्धता होईल याचे नियोजन करा.

· पाणीटंचाई भासणाऱ्या गावांची मागणी आल्यास टॅंकर पुरवा.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासन परिश्रमपूर्वक काम करीत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी सोलापूर शहरवासियांचे सहकार्य आवश्यक आहे. तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू प्रसारास रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी नागरिकांना आवाहन केले.

ते म्हणाले, शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहेत. मात्र या यंत्रणेस नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी घरातच थांबावे. अत्यावश्यक कामाशिवाय बिलकुल घराबाहेर पडू नये. आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

अहमदनगर लाईव्ह 24