मुंबई, दि.२६ – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,३०,६७० पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
तसेच ५६५,७२६ व्यक्तींना क्वॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २५ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ११५,२६३ गुन्हे नोंद झाले असून २३,२०४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ४८लाख ६२ हजार ९४७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कडक कारवाई
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दृष्टप्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत.
अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २४८ घटना घडल्या. त्यात ८३० व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
१०० नंबर-९५ हजार फोन
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर ९५,९११ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे अशा ६९५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,६५,७२६ व्यक्ती (Quarantine) आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७२,६८७ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलीस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ११ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण १२, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण २, ए.टी.एस.१,ठाणे ग्रामीण १ अशा २० पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला.
पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
रिलिफ कॅम्प
राज्यात एकूण १२३१ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ७६,२१३ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.