वर्धा, दि. २६ :- झारखंड येथील पुण्याहून पायी निघालेले 16 मजुरांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना हावडाला जाणाऱ्या श्रमिक ट्रेनने आज पाठविण्यात आले.
पुण्याहून 16 मजूर पायी झारखंडला निघाले होते. 23 मे रोजी रात्री ते वर्ध्यात पोहचले रेल्वे स्टेशनला त्यांना काही व्यक्तींनी जेवण दिले. त्यातील एका कामगाराची प्रकृती 24 मे रोजी सकाळी बिघडल्याने त्याला सामान्य रुग्णालायत आणण्यात आले.
त्याला लगेच सेवाग्राम येथे नेताना त्याचा मृत्यू झाला. मयत मजुरांसहित इतर 15 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून सर्व 16 कामगार कोरोना बाधित नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले.
यासंदर्भात झारखंडचे आरोग्यमंत्री, पोलीस उपमहानिरीक्षक राजीव रंजन सिंग, पश्चिम सिंगभूमचे जिल्हाधिकारी आरव राजकमल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरकुमार पांडे यांच्याशी समन्वय करून 15 कामगारांना सोडण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले.
आज वर्धेतून त्यांना नागपूरपर्यंत एसटीने पाठविण्यात आले आहे. नागपूरहून निघालेल्या श्रमिक ट्रेनने त्यांना हावडा येथे सोडण्यात येईल.
तेथून झारखंड शासन त्यांना त्यांच्यागावापर्यंत सोडण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिली.
मृत व्यक्तीवर वर्धेतच अंत्यसंस्कार
16 मजुरांपैकी मृत्यू पावलेल्या एका व्यक्तीवर झारखंड शासनाच्या सूचनेनुसार वर्धा येथेच दफनविधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मजुरांपैकी दोघेजण उपस्थित होते, तसेच पोलीस, आरोग्य आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पश्चिम बंगालच्या 90 नागरिकांची रवानगी
लॉकडाऊनमुळे वर्धेत अडकलेल्या नागरिकांना आज नागपूरहून निघालेल्या श्रमिक रेल्वेने पश्चिम बंगाल मधील हावडा येथे पाठविण्यात आले.
या नागरिकांना 5 बसमधून नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचविण्यात आले. यामध्ये हिंगणघाट मधील 84, तर वर्धेतील 6 कामगार, नोकरदार व विद्यार्थ्यांचा समावेश आहे.