मुंबई :- मी शुक्रवारी दुपारी दोन वाजता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालय परिसरात गर्दी करू नये. शांतता राखावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवार आपल्या ट्विटद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त माध्यमात आल्यानंतर पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी या घोटाळ्याशी आपला संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मी स्वतः ईडीच्या कार्यालयात २७ सप्टेंबरला हजर होऊन चौकशीला सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. गुरुवारी पवार यांनी दोन स्वतंत्र ट्विट केले – मी ठरल्याप्रमाणे उद्या दोन वाजता ईडी कार्यालयात जात आहे. या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये. प्रशासकीय संस्थांचा मान राखावा. पोलिसांना सहकार्य करावे.