अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या माळीवाडा येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
या वेळी आमदार जगताप यांच्यासह गिरवले कुटुंबीयही भावनाविवश झाले होते. नगर शहराच्या राजकारणात गिरवले यांनी नेहमीच जगताप कुटुंबीयांना साथ दिली. राजकारणासह कौटुंबिक सुख-दुःखातही त्यांची साथ कायम असायची.
केडगाव हत्याकांडात जगताप यांच्यावर आरोप झाल्यानंतर कैलास गिरवले यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली होती. तेथे झालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिस कोठडीत असतानाच गिरवले यांचा मृत्यू झाला होता. शेवटपर्यंत साथ देणाऱ्या गिरवलेंबाबत जगताप कुटुंबीयांमध्ये आजही आस्था व आपुलकीचे नाते कायम आहे. त्यामुळेच जगताप यांनी निकालानंतर गिरवले कुटुंबीयांची भेट घेतली.