परस्पर सहकार्याने उद्योगांचे प्रश्न सोडवू – उद्योगमंत्री सुभाष देसाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि. 27 :आपली खरी लढाई कोरोनाशी असून त्याचे सर्वांना भान ठेवावे लागेल. त्याचवेळी उद्योगचक्र सुरू करून अर्थव्यवस्थेला चालनाही द्यावी लागेल, हे कार्य परस्पर संवाद आणि सहकार्याने करू असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर या शिखर संस्थेने आयोजित केलेल्या ई-सभेत बोलत होते.

महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने लॉकडाऊननंतर उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री. देसाई यांच्यासोबत संवाद साधला.

यावेळी चेंबर्सच्या राज्यभरातील 250 पेक्षा अधिक उद्योजक, व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला व खास करून लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.

अशा परिस्थितीत व्यापार व उद्योगांना जाणवणाऱ्या अडचणी  तसेच टाळेबंदी संपल्यानंतर उद्योग सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

चेंबर्सचे अध्यक्ष मंडलेचा यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई,  उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी,  एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन व सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले व सद्यपरिस्थीतीची माहिती दिली.

ते  म्हणाले की, लघु, मध्यम उद्योग तसेच व्यापारी व शेतकरी यांना जाणवत असलेल्या अडचणींबाबत तसेच उद्योग सुरू करण्यासाठी सरकार करीत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. राज्यातील सर्व उद्योजक सरकारसोबत असून सरकारच्या सर्व सूचनांचे पालन केले जाईल.

यावेळी उद्योगांना भांडवल उभारणी, कामगार नसणे, व्याज दर, बँकाचे कर्ज मिळणे,  वीज बिल, पाणी बिल व विविध कर, कामगारांचे पगार,  निर्यातीसाठी चालना मिळावी याकरिता प्रयत्न करणे,  कृषी माल काढण्यासाठी मजुरांची उपलब्धता अशा अनेक अडचणी असल्याचे काही सदस्यांनी सांगितले.

यानंतर श्री. देसाई म्हणाले की, उद्योग सुरू करण्याची तयारी केली आहे. वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा कृतीगट स्थापन केला. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना डोळ्यासमोर ठेवून ऑनलाइन प्रक्रिया राबवून उद्योगांना परवाने दिले आहेत.

आजपर्यंत पंचवीस हजारांपर्यंत उद्योग सुरू करण्यास परवानी मागितली आहे. दरम्यान, स्वयंचलित दुचाकी वाहनांसाठीचे दहा किलोमीटर अंतराचे बंधन दूर करण्याची मागणी काही उद्योजकांनी केली आहे.

त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात येईल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले. उद्योजकांना जाणवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्प डेस्क सुरू करू असेही श्री. देसाई म्हणाले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,  इंडस्ट्री अण्ड अँग्रिकल्चरचे विश्वस्त आशिष पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले. या चर्चासत्रामधे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,  इंडस्ट्री अण्ड अग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा,  विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अण्ड इंडस्ट्रिजचे विवेक दालमिया,

अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स,  इंडस्ट्रीचे अध्यक्ष विनोद कलंत्री, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स,  इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरचे अध्यक्ष राजु राठी,  चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अँग्रिकल्चरचे अध्यक्ष गिरिधर संगनेरिया,  इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष आशिष वेद ,

एमईडीसीचे रवींद्र बोराटकर आदी उपस्थित होते. या शिवाय  चेंबरचे माजी अध्यक्ष मीनल मोहाडीकर, वरिष्ट उपाध्यक्ष ललित गांधी,  उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा,  रविंद्र मानगावे,  शुभांगी तिरोडकर,

उमेश दाशरथी,  आयमचे धनंजय बेले, अजित सुराणा,  सुनीता फाल्गुने, सोनल दगडे, करुणाकर शेट्टी,  उमेश पै,  सतीश मालू,  भारत खंडेलवाल, नामकर्ण आवारे यांनी सहभाग घेतला.

अहमदनगर लाईव्ह 24