शिर्डी, दि. २७ : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अत्यंत प्रभावीपणे काम करत आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. येणाऱ्या खरीप हंगामातील पिकांचे नियोजन, बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांची उपलब्धता इत्यादी बाबींच्या पूर्वतयारीचा आढावा महसूलमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री महसूल मंत्री थोरात यांनी घेतलेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, महसूल मत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुभाष काटकर, पंचायत समितीचे कृषी अधिकारी किरण अरगडे सहभागी झाले होते.
येणाऱ्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने बी-बियाणे, रासायनिक खतांचे व औषधांचे नियोजन करावे, तालुक्यात कुठेही याचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच गेल्या दोन-तीन वर्षांपासून खरीप पिकाची मागणी लक्षात घेवून ज्या वाणांस चांगला प्रतिसाद मिळतो त्या वाणांच्या बियाण्याची उपलब्धता मुबलक होईल याचे नियोजन करावे,
असे निर्देश महसूल मंत्री थोरात यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणाकरिता तालुकास्तरीय तक्रार निवारण कक्षाची स्थापना तात्काळ करावी, भरारी पथकाचे काम सुरु करावे, पीक विमा भरपाईमध्ये पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व काय आहे याबाबत गावपातळी पर्यंत जागृती करणे याबाबत नियोजन करण्यासाठी मंत्रीमहोदयांनी मार्गदर्शन केले.
तालुक्यातील शेतकरी उत्पादक गटांच्यामार्फत लॉकडाऊनच्या काळात मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरी भागातील ग्राहकांना भाजीपाला पुरवठा करणाऱ्या मुल्य साखळीचे सबलीकरण करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. याकरिता शेतकऱ्यांच्या गटास अनुदानीत पॅक हाऊस उभारणी करुन देणे, शीतवाहन उपलब्ध करुन देण्याची त्यांनी सूचना केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांना स्थलांतर करण्याची वेळ येवू नये व गावातच त्यांना काम उपलब्ध होईल अशा सूचना देताना मनरेगाअंतर्गत शेततळे व कंपार्टमेंट बंडीगच्या कामाचे नियोजन कृषी विभागाने करावे असे सांगितले.
तालुक्यातील काही गावांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निदर्शनास आणून दिले. याकरिता महसूल व ग्रामविकास विभागांनी योग्य समन्वयाने टँकर मंजुरीची कार्यवाही त्वरीत पूर्ण करुन आवश्यकतेप्रमाणे पाणी पुरवठा करण्याबाबतच्या सूचनाही प्रशासनला दिल्या.