डाकिया ‘कॅश’ लाया!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोला,दि. २७ (जिमाका) – गावगाड्यातल्या दैनंदिन जीवनाशी एकरुप झालेला हा ‘डाकिया अर्थात पोस्टमन’  हल्लीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात  ई-मेल, व्हॉट्स ॲप, फेसबुक या संदेशवहन सुविधांच्या गजबजाटात  काहीचा मागे पडला होता.

पण ‘लॉक डाऊन’च्या काळात पोस्टमनची गावगाड्याशी तुटलेली नाळ पुन्हा जोडली गेली आहे. डाकिया आता टपालासोबत  ‘कॅश’ आणि गरजेच्या वस्तूही आणू लागलाय. याला निमित्त ठरलंय ते  लॉक डाऊन!

डाकिया हा पोस्टमनचा हिंदी पर्यायी शब्द! फार जुनं नाही, पण १९७७ मध्ये आलेल्या ‘पलकोंकी छांव’ या चित्रपटातलं ‘डाकिया डाक लाया, खुशी का पयाम, कही दर्दनाक लाया’ हे गुलजार यांचं गीत खूप गाजलं होतं. हे गीत पोस्टमनचं गावातल्या जीवनाशी  एकात्म नातं अधोरेखित करतं.

कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधाचा एक भाग म्हणून गेले महिनाभरापासून अधिक काळ आपण सारे लॉकडाऊन मध्ये आहोत. या ‘लॉकडाऊन’ मध्ये अनेक घटकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांमधून मार्ग काढत मार्गक्रमण करण्यात प्रशासन सर्वतोपरी मदत करीत आहे.

त्यातलाच एक भाग म्हणजे भारतीय डाक विभागाची  ‘आधार संलग्नित पेमेंट व्यवस्था’(AEPS) ही सेवा. या सेवेमुळे ४८९१ लोकांना एक कोटी पाच लक्ष ६५ हजार ९३६ रुपयांची रक्कम घरपोच पोहोचविण्यात आली आहे. यात रक्कम व सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येपेक्षाही ‘पोस्टमन वरचा ग्राहकांचा विश्वास’ हा महत्त्वाचा आहे.

या सेवेत  बॅंक खात्यात जमा होणारी पेन्शन,  प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना दिले जाणारे लाभ यांचा समावेश आहे.

अकोला डाक विभागाअंतर्गत अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांचा समावेश  होतो. त्यात अकोला येथील विभागीय कार्यालय, प्रधान डाकघर कार्यालय, मुख्य डाकघर कार्यालय, ४३ उपडाकघर कार्यालये व ३५४ शाखा डाकघर कार्यालये आहेत.  या सर्व कार्यालयांमार्फत ही सुविधा लोकांना पुरविली जात आहे.

सेवेचा लाभ कसा घ्याल?

याबाबत अकोला डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक व्ही. के. मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवेत जे नागरिक घराबाहेर येऊ शकत नाहीत त्यांना त्यांच्या राष्ट्रीय बॅंक खात्यातून  दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम पोस्टमन मार्फत घरपोच अदा केली जाते. या सोबतच किराणा माल इत्यादीही पोहोचविला जातो.

त्यासाठी ज्यांचे राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते आहेत त्या व्यक्तींनी प्रवर अधिक्षक डाक घर अकोला विभाग अकोला यांच्या  दूरध्वनी  ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळात आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक रक्कम  आणि हवे असलेले किराणा सामान याची माहिती द्यावी. पोस्टमन मार्फत घरपोच रोख रक्कम व किराणा सामान पोहोचविले जाते.

बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक

हेल्पलाईन नंबरवर भारतीय डाक विभागाकडे ग्राहक आपल्या बॅंक खात्यातील  रकमेची मागणी नोंदवतात. त्याप्रमाणे पोस्टमन  त्या ग्राहकाकडे घरी जाऊन बॅंक खात्याशी  ऑनलाईन जोडून घेतो. ग्राहकाचे बॅंकेशी आधार क्रमांकावरुन बायोमेट्रीक पडताळणी होते.

ती खातरजमा झाल्यावरच ग्राहकाला त्यांनी मागणी केल्याप्रमाणे रक्कम पोहोचविली जाते. हे सगळे करताना शारीरिक अंतर पाळण्याची तसेच सॅनिटायझेशन पाळण्याची खबरदारी घेतली जाते.

औषधे आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूही

या सोबतच टपाल विभाग हा ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूही पुरविण्याची सेवा देत आहे. त्यात ग्राहकाला फक्त वस्तूची रक्कम अदा करावी लागते. त्यात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लागणारी औषधे व त्यांच्या अन्य आवश्यकतांनुसार वस्तूंची उपलब्धता सशुल्क केली जाते. यात ने-आण साठी कोणतेही पैसे आकारले जात नाहीत मात्र वस्तूची किंमत मात्र ग्राहकाला अदा करावी लागते.

डाक ऑफिस सुविधांचे आगार

आतापर्यंत डाक विभागाच्या अन्य सेवा जसे  पोस्ट ऑफिसच्या बचत सेवे मार्फत २८ हजार ७२० लोकांनी २६ कोटी ७३ लाख ६३ हजार २०८ रुपये जमा केले आहेत. तर १० हजार ८८८ लोकांनी २४ कोटी ६२ लाख २३ हजार ९०० रुपये खात्यातून आपल्या दैनंदिन गरजांसाठी काढून वापरले आहेत.

अर्थात हे त्यांनी  पोस्टाच्या एटीएम सुविधेतून ४२३ लोकांनी १४ लक्ष ५८ हजार १०० रुपये रक्कम काढून आपली गरज भागविली आहे. तसेच स्पीड पोस्ट व पार्सल सुविधेमार्फत १०७ लोकांना वैद्यकीय सामुग्री (औषधी व अन्य) पोहोचविण्यात आली आहे.

ही सामुग्री त्वरित वितरित केली जाते.   या साठी डाक विभागाची आरएमएस स्पेशल व्हॅन सेवा सुरु आहे. ही सेवा देतानाच पोस्टाचे कर्मचारी गरजूंना अन्नदानही करत असून आतापर्यंत ३१० लोकांना अन्नदान केले आहे. याशिवाय  ३० लोकांना अन्नधान्य किट वाटप केले आहे, हे अर्थातच सेवाभावी वृत्तीने.

कधीचा काहीसा दुरावलेला पोस्टमन यानिमित्ताने  पुन्हा कुटुंबाचा, गावगाड्याचा भाग होतोय, ते ही आपल्या पूर्वापार विश्वासाच्या बळावर, हे या आपत्तीतही नक्कीच सुखावणारे आहे.

अहमदनगर लाईव्ह 24