पीक संरचनेत बदल करा – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

चंद्रपूर, दि. २७ : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्याची अर्थव्यवस्था केवळ शेतीपूरक उपाययोजनांवर टिकणारी असणार आहे. त्यामुळे या परिस्थितीत पीक रचनेतील बदल व शेतीपूरक व्यवसायाला पूरक अशा उपाययोजना शेतकऱ्यांसाठी तयार करण्याची

सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री यांच्यासह खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले,आमदार सुभाष धोटे,

किशोर जोरगेवार, कीर्तीकुमार भांगडिया, प्रतिभाताई धानोरकर,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील आदींसह कृषी विभाग व अन्य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. याचा परिणाम स्थानिक प्रशासनापासून तर राज्य शासनापर्यंत सर्वांवरच होणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कृषी-आधारित मजबूत अर्थव्यवस्था कशी निर्माण होईल, याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे.

त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतीमध्ये कोणते पीक घेतले पाहिजे, त्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, कमी मनुष्यबळात यांत्रिक शेतीचा कसा वापर केला पाहिजे, तसेच शेतीपूरक जोड धंद्यांना प्रत्येक घराघरातून कशी चालना मिळाली पाहिजे, याकडे लक्ष वेधले जाईल अशा पद्धतीचे नियोजन खरीप हंगामासाठी करण्याचे त्यांनी कृषी विभागाला निर्देशित केले.

सन 2020 मध्ये खरीप हंगामाकरिता 4 लक्ष 68 हजार 900 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये भात 1 लक्ष 80 हजार, सोयाबीन 55 हजार, कापूस 1 लक्ष 80 हजार, तूर 44 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.

त्याकरिता जिल्ह्यात विविध पिकाकरिता एकूण 70 हजार 803 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यास खरीप हंगामाकरिता 1 लक्ष 33 हजार 110 मेट्रीक टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. 25 एप्रिल जिल्ह्यात 7 हजार 457 मेट्रीक टन खत प्राप्त झाले आहे. 4 हजार 444 मेट्रीक टन खताची आतापर्यंत विक्री झालेली असून 24 हजार 802 मेट्रीक टन रासायनिक खत शिल्लक आहे.

उपस्थित आमदारांनी यावेळी शेतकऱ्यांना यावर्षी होणारा पतपुरवठा, गेल्या वर्षातील कर्जमाफीमध्ये मागे राहिलेले शेतकरी, त्यांना पुरवण्यात येणारे कर्ज, त्यासाठीचे अडथळे यावर देखील चर्चा केली.

बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या काळामध्ये शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक देत पुढील हंगामासाठी कर्ज वितरित करावे, जिल्ह्यात मागेल त्याला ट्रॅक्टर योजना सुरू करावी, अशी सूचना यावेळी खासदार सुरेश धानोरकर यांनी केली.

आमदार सुभाष धोटे यांनी वैरण विकास, दुध उत्पादन व पशु संवर्धन यासंदर्भात नियोजन करण्याची सूचना केली. आमदार किशोर जोरगेवार, आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या गटांना प्रशिक्षण व अर्थार्जन करणाऱ्या पीक पद्धतीला चालना देण्याची सूचना केली.

अहमदनगर लाईव्ह 24