कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी कडक निर्णय– पालकमंत्री

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

यवतमाळ, दि. 27 : दिवसेंदिवस यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही सर्वांसाठीच चिंतेची बाब असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने जास्तीत जास्त नमुने तपासणीकरिता पाठविण्यात येत आहे.

हा संसर्ग इतरत्र होऊ नये म्हणून आणखी कडक निर्णय घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असली तरी प्रशासन सर्व गोष्टींची अतिशय गांभिर्याने दखल घेत आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी 15 तालुक्यात याचा संसर्ग नाही.

यवतमाळ तालुक्यातसुध्दा कोरोनाचा संसर्ग नसून केवळ शहरात आहे. दिल्ली कनेक्शनचे लोक इतरत्र फिरले त्यामुळे याचा प्रादुर्भाव वाढला. तरीसुध्दा ही परिस्थिती पुर्ववत आणण्यासाठी तसेच विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन-प्रशासन नियोजनपध्दतीने काम करीत आहे.

शहरातील प्रतिबंधित क्षेत्राच्या परिघाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. नागरिकांना अत्यावश्यक वस्तु आणण्यासाठी सुविधा दिली तर नागरिक त्याचा गैरफायदा घेतांना निदर्शनास आले आहे.

विनाकारण लोक गर्दी करीत असून बेजबाबदारीने वागत असल्यामुळे आणखी कडक निर्णय घेण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे नागरिकांना असुविधा होईल पण तरीसुध्दा नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

जिल्ह्यात आतापर्यंत 89 फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. यात 65 प्राथमिक आरोग्य केंद्र, 14 ग्रामीण रुग्णालय आणि प्रतिबंधित क्षेत्रातील 10 क्लिनिकचा समावेश आहे.

या फिवर क्लिनिकमध्ये ताप, सर्दी, खोकला, सारी, अंग दुखणे, श्वसनाचा त्रास आदींची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील नागरिकांना यापैकी काही लक्षणे असल्यास त्यांनी नजीकच्या फिवर क्लिनिकमध्ये जावून तपासणी करून घ्यावी, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, सुरवातीचे तीन रुग्ण सोडले तर जिल्ह्यात संसर्गाच्या केसेस कमी झाल्या होत्या. मात्र दिल्ली कनेक्शनमुळे त्याची व्याप्ती वाढली. त्यामुळे प्रशासनाने सहा प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. यापैकी पाच क्षेत्रातून एकही पॉझेटिव्ह केस नाही. सर्व केसेस केवळ एकाच भागातून येत असल्यामुळे या भागात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

इतर पाच क्षेत्राची प्रतिबंधीत मर्यादा संपली असली तरी परिस्थिती पाहून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पूर्वीचे 14 पॉझेटिव्ह रुग्ण सोडले तर या एकाच प्रतिबंधित भागातून जवळपास 47 रुग्ण पॉझेटिव्ह आले आहेत. प्रशासनाच्या वतीने 100 टक्के लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण 63 पॉझेटिव्ह रुग्ण असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ते भरती आहे. आतापर्यंत 10 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत पॉझेटिव्ह झालेल्या एकूण 73 जणांपैकी 43 पुरुष आणि 30 महिला आहेत. आतापर्यंत नागपूरला तपासणीकरिता पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी आता 80 नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24