हिंगोली जिल्ह्याची खरीप-२०२० हंगामपूर्व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री वर्षाताई गायकवाड बोलत होत्या.
यावेळी खासदार राजीव सातव, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद पोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, सहकार विभागाचे उपनिबंधक सुधीर मैत्रेवार, कृषि विकास अधिकारी एन. आर. कानवडे यांची यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती होती.
पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या की, खरीप हंगाम-२०२० करिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी प्राप्त होवू नये, याची कृषी विभागाने दक्षाता घ्यावी. तसेच बियाणांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांची तक्रार येवू नये याकरीता आतापासूनच उपाययोजना कराव्यात.
जिल्ह्यातील एकुण लागवडी लायक क्षेत्रापैकी ३,७८,९९२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. खरीप पिकामध्ये प्रामुख्याने सोयाबीन २,५५,४०० हेक्टर, तूर ५२,५०० हेक्टर, कापूस ४५,००० हेक्टर एवढ्या क्षेत्रावर प्रमुख पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय जिल्ह्यात तृणधान्य ७,९५४ हेक्टर, कडधान्य ७०,३३३ हेक्टर व गळीत धान्य २,५५,६५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणे अपेक्षित आहे.
तसेच या खरीप हंगामात सोयाबीन ५,०९३ हेक्टर, कडधान्य पिकामध्ये तूर २,००६ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरणीची वाढ होणे अपेक्षीत आहे. तर कापुस पिकाच्या क्षेत्रामध्ये गतवर्षीच्या तुलनेत २,०११ हेक्टर एवढ्या क्षेत्राची घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये हळद पीक हे शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक म्हणून समोर येत असून, गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी २,१५१ हेक्टर एवढ्या वाढीव क्षेत्रासह एकुण ३८,४५० हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होणे अपेक्षित असल्याची माहिती पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात सोयाबीनच्या प्रस्तावित क्षेत्राकरिता एकुण १,६६,००० क्विंटल बियाणांची अवश्यकता असून, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खाजगी कंपन्या तसेच शेतकऱ्यांचे स्वत:कडील बियाणे इत्यादी माध्यमातुन हे बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन बियाणांची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे.
कापसाच्या प्रस्तावीत क्षेत्राकरिता विविध कंपन्याचे २,२५,००० बीटी कापूस बियाण्याची पाकिटे उपलब्ध आहेत. एकंदरीत खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात सोयाबीन, तूर, कापूस इत्यादी मुख्य पिका व्यतिरिक्त ज्वारी, मूग, उडीद, मका इत्यादी पिकांची बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्यात कोणत्याही प्रकारची जिल्ह्याला कमतरता भासणार नाही.
तसेच जिल्ह्याला या खरीप हंगामासाठी एकुण ६५,२३० मेट्रीक टन एवढे रासायनिक खताचे आवंटन मंजुर झाले असून, मंजुर आवंटनाप्रमाणे खताचा पुरवठा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. तसेच शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रतीच्या कृषि निविष्ठा उपलब्ध व्हावी व त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी जि.प., हिंगेाली यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रत्येक तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १ याप्रमाणे एकुण ६ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांच्या कृषि निविष्ठेबाबत तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगेाली यांच्या अध्यक्षतेखाली १ व प्रत्येक तालुक्यातील उपविभागीय कृषि अधिकारी, हिंगेाली यांच्या अध्यक्षतेखाली एकुण ६ तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप- २०२० मध्ये रु. १,१६८.९५ कोटी व रब्बी हंगामाकरिता रु. २७४.७८ कोटी असे एकुण रक्कम रु. १,४४३.७३ कोटी एवढ्या पीक कर्ज वितरणांचे नियोजन करण्यात आल्याचे ही पालकमंत्री गायकवाड यावेळी म्हणाल्या.
जिल्ह्यातील वीज जोडणीकरिता प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या अर्जावर तात्काळ कार्यवाही करुन संबंधीतांनी वीज जोडणी द्यावी. तसेच खरीप हंगामात बोगस बियाणे, रासायनिक खते किटकनाशके विक्री व वितरण करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे व रासायनिक खते योग्य प्रमाणात व योग्य वेळेत उपलब्ध होतील
याकरीता कृषि विभागाने योग्य नियोजन करावे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागु असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील शेतीशी निगडीत सर्व कामे, तसेच शेतीशी निगडीत उद्योग धंदे, कृषि निविष्ठा केंद्रे, कृषि यंत्रे व अवजारे इत्यादी दुकाने, कृषिमाल, बियाणे व रासायनिक खते वाहतुक इत्यादीनी कोरोना विषाणुच्या संसर्गाबाबत योग्य ती खबरदारी घेवून सुरळीतपणे सुरु राहतील याकरीता योग्य उपाययोजना कराव्यात.
तसेच बियाणांची उगवण क्षमता, रासयनिक खत आणि बियाणांची उपलब्धता व पुरवठा, शेततळे, सिंचन विहीर, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कृषी पंपांना वीज जोडणी, मृद आरोग्य पत्रिका, कृषी विस्तार कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, रेशीम लागवड, पीक विमा, फलोत्पादन कार्यक्रम, आपत्कालीन पीक नियोजन आदी बाबींचा सविस्तर आढावा घेवून पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या.
यावेळी खासदार राजीव सातव म्हणाले की, या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी शेतकऱ्यांना खत व बीयाणे खरेदीसाठी सर्व कृषि कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत. तसेच जिल्ह्याकरीता रासायनिक खताचे आवंटन मंजुर झाल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
तसेच खासदार हेमंत पाटील यांनी निकृष्ट बीयाणे व खतांचा पुरवठा होवू नये याकरीता जिल्ह्यात भरारी पथकांची नियुक्ती करावी. तसेच बीयाणे व खतांच्या गुणनियंत्रणाबाबत तक्रार नोंदविण्यासाठी जिल्ह्यात तक्रार निवारण केंद्रे स्थापन करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी बीयाणे, रासायनीक खते, किटकनाशके याची उपलब्धता तसेच पेरणीपूर्व काळजी व किडनियंत्रण, पतपुरवठा आदी माहितीचे आढावा बैठकीत सादरीकरण केले.