अमरावती २८ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क उपयुक्त ठरत आहेत. मास्कची मागणी पाहता लॉकडाऊनच्या काळात अमरावतीतील १३ बचतगटांनी मास्क निर्मितीचे काम हाती घेतले आहे.
लॉकडाऊनच्या काळात बचतगटांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. बचतगटांनी बनविलेले मास्क आरोग्य क्षेत्रात सेवेत असणाऱ्यांसोबतच सफाई कामगारांनाही सुरक्षा देत आहेत.
दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत अमरावतीतील 13 महिला बचतगटांचा समूह अमरावती महापालिकेसाठी मास्क बनविण्याचे काम करीत आहे.
या बचतगटांनी महापालिकेसाठी दहा हजार मास्क तयार केले आहेत. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे मास्क बनविण्यात आले आहेत.
यात पालिकेंतर्गत येणाऱ्या रूग्णालयातील डॉक्टर, आरोग्य सेविकांसह पालिकेतील सफाई कर्मचारी, संचारबंदीदरम्यान जिल्ह्यात अडकलेल्या नागरिक, निराधारांना हे मास्क मोफत वितरित करण्यात येत आहेत.
लक्ष्मी महिला बचतगट, पूजा महिला बचतगट, दत्तप्रभू महिला बचतगट, महालक्ष्मी महिला बचतगट, त्रिवेणी महिला बचतगट, रेणुका महिला बचतगट, यश महिला बचतगट, ओम महिला बचतगट, वैभवलक्ष्मी महिला बचतगट, शारदा महिला बचतगट, अनमोल महिला बचतगट, प्रगती महिला बचतगट, यश महिला बचतगट हे 13 बचतगट मास्कची मागणी पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
बचतगटातील महिला स्वत:च्या घरीच मास्क तयार करण्याचे काम करतात. या महिला दिवसभरात सुमारे सहा तास काम करून 600 ते 800 मास्क तयार करतात. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार हे मास्क तयार केले जात आहेत. हे मास्क कापडी असल्यामुळे त्यांचा पुर्नवापरही करता येणे शक्य आहे.
या बचतगटांनी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळालाही मास्कचा पुरवठा केला आहे. आतापर्यंत या बचतगटांनी 50 हजारवर मास्क तयार केले आहेत. तसेच सुरक्षा ड्रेसही या बचतगटांनी तयार केले आहेत. अमरावती महानगरपालिकेने मास्क बनविण्यासाठी लागणारा कापड खादी ग्रामोद्योगकडून उपलब्ध करून दिला आहे.
बचतगटामधील महिला या सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीतील आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांना रोजगार मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक विवंचनाही काही प्रमाणात दूर झाली आहे. तसेच त्यांना या आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्याची संधीही मिळाली, असल्याची भावना अभियानाचे शहर प्रकल्प अधिकारी तथा सहायक आयुक्त नरेंद्र वानखेडे यांनी व्यक्त केली.