नाशिक, दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना मुक्तीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने व समन्वयाने काम करीत असून संपूर्ण राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ मालेगांव हे कोरोनाच्या दृष्टीने अतिजोखीमेचे ठिकाण आहे.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्य शासनाच्या दृष्टीने कोरोनामुक्तीसाठी सर्वोच्च केंद्रस्थानी असून मालेगावसाठी कुठलीही तडजोड करू नये, अशा सूचना आज संयुक्तपणे पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
Maha Info Corona Website आज जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व प्रशासकीय उपाययोजना यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना संयुक्तपणे मार्गदर्शन करतांना पालकमंत्री श्री.भुजबळ, गृहमंत्री श्री.देशमुख, आरोग्यमंत्री श्री.टोपे व कृषीमंत्री श्री.भुसे बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, उपसंचालक आरोग्य डॉ.पठाणशेट्टी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे व विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मोठ्या लढ्याची तयारी ठेवावी : पालकमंत्री छगन भुजबळ कोरोनाच्याबाबतीत नाशिक जिल्हा अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. कोरोनाच्या निमित्ताने भविष्यात सामाजिक धार्मिक, राजकीय आणि प्रशासकीय अशा विविध प्रकारच्या समस्या समोर येणार आहेत. या सर्वांसह लोकांचे सार्वजनिक आरोग्य राखण्याचे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे,
त्यासाठी सर्वांना मोठ्या लढ्याची तयारी ठेवावी लागेल, खूप कष्ट घ्यावे लागतील, असे यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. श्री.भुजबळ म्हणाले, मालेगावमध्ये जी परिस्थती निर्माण झाली त्याबाबतीत सुरूवातीपासूनच उपायोजना थोड्या प्रमाणत सुरू होत्या. सर्वेक्षणाला एनआरसी, एनपीआरची जोड देण्यात आल्याने याबाबतीत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमजाचे वातावरण होते.
स्थानिक लोकप्रतिनिधी, धर्मगुरू यांनी या प्रकरणात प्रशासनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याने आज प्रशासकीय पातळीवर मालेगावमध्ये उपायोजनांना यश मिळतांना दिसत आहे. सुरवातीच्या काळात कोरोनामुक्त असलेल्या नाशिक जिल्ह्याने मालेगावच्या रूपात कोरोनाचा उद्रेक अनुभवला.
मालेगावच्या बाहेर तालुक्याच्या काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येते, याचे प्रमुख कारण मालेगाव शहरातील काही लोकांनी आसपासच्या गावांमध्ये केलेला संचार आहे. मालेगावमधून बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार नाही व मालेगाव शहरातून कुणीही आसपासच्या गावांमध्ये जाणार नाही याची खरबरदारी घ्यावी.
मुंबईहून नाशिककडे येणाऱ्यांची मोठी रांग मुंबई-नाशिक रस्त्यावर दिसून येते. अनेक कुटुंबासोबत लहान मुलेही दिसून येतात. त्यांच्याशी मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने व्यवहार करावा, ज्यांच्याकडे बाहेर जाण्याची परवानगी आहे, त्यांना अडवू नका. अडचणी खूप आहेत. तरीही मतभेद होणार नाहीत याची काळजी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी घ्यावी.
गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत व्यस्त दिनक्रमातून व अडचणीच्या काळात नाशिक जिल्ह्याला भेट देवून सर्व अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले, त्याबद्दल त्यांचे आभारही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी मानले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार
नाही याची खबरदारी घ्यावी : गृहमंत्री अनिल देशमुख राज्यात सद्य:स्थितीत स्थलांतरीत मजुरांची समस्या गंभीर असून नाशिक जिल्ह्यातही 1 हजार 900 स्थलांतरीत मजूर आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री केंद्र सरकारच्या संपर्कात असून राज्यातील सर्व स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार व त्या त्या राज्याकडे प्रयत्नशील आहोत.
3 मे रोजी लॉकडाऊन सुटण्याच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणवर राज्यातील जनता असून 3 मे रोजी ही स्थिती कायम राहिल्यास कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी पोलीस यंत्रणेने घ्यावी, अशा सूचना यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. मंत्री श्री.देशमुख म्हणाले,
मालेगावातील मुस्लिम वस्त्यांमधील गर्दी सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा विषय असून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, त्याठिकाणी सर्व सोयी सुविधांवर लक्ष केंद्रित करावे. गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर साधन सामुग्री व पोलिसबळ मालेगावसाठी देण्यात आले आहे
व मागणी केल्यास भविष्यातही वाढवून दिले जाईल. मालेगावातील घराघरात सर्वे करण्यावर भर देण्यात यावा. प्रतिनियुक्तीने जे हजर होणार नाहीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाइनशिवाय पर्याय नाही. तसेच भाजीपाल्याच्या गाड्यांच्या माध्यमातून परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख यांनी दिल्या. सर्वेक्षणातच कोरोना नियंत्रणाचे यश : आरोग्य मंत्री राजेश टोपे कोरोना साथ रोगाच्या निमित्ताने होणऱ्या सर्वेक्षणात आरोग्य यंत्रणांची पथके घरोघरी जात आहेत.
परंतू लोक घरातील लोकांची खरी संख्या सांगत नाही. सर्वेक्षण करणारे त्यांना ओळखतही नाही, अशा परिस्थितीत मतदार यादी व पल्स पोलिओ अभियानाच्या याद्यांचा संदर्भ घेवून सर्वेक्षण केल्यास मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाला यश मिळेल. सर्वेक्षण हाच कोरोना नियंत्रणाचा पहिला टप्पा असून त्यात मिळालेले यश हे महत्त्वाचे असेल, त्यात अपयश आल्यास कोरोना नियंत्रणाची दिशाच चुकू शकते.
त्यामुळे अचूक सर्वेक्षणावर भर देण्यात यावा, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. ते म्हणाले, 10 ते 15 दिवस प्रलंबित असलेल्या नमुन्यांचे अहवाल हे निगेटिव्ह येवू शकतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जास्त काळ अहवाल प्रलंबित असलेल्या संशयित रूग्णांचे नव्याने स्वॅब घेण्यात यावेत. नमुन्यांचे अहवाल मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
एनआयबीच्या संचालक व लॅब इनचार्ज यांच्याशी समन्वय साधून किती दिवसांचा जुना अहवाल हा ग्राह्य धरावा याबाबत मार्गदर्शन घेण्यात यावे. एकूण रूग्णांच्या 5 टक्के लोकांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल, असे गृहीत धरून तयारी ठेवावी. खाजगी हॉस्पीटल्स व क्लिनीक यांची सक्रियता वाढविण्यात यावी. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे,
वेळेवर निदान झाल्यास तात्काळ उपचार सुरू करता येतात. सर्वेक्षणामध्ये एक्सरे डायाग्नोसिस केल्यास त्याचे परिणाम चांगले दिसून येतील. पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व पोर्टेबल एक्सरेची सुविधा डिजिटल माध्यमातून केल्यास कार्डियोलॉजिस्टच्या माध्यमातून त्याचे तात्काळ निदान करता येवू शकते. स्वतंत्र तापाची तपासणी करणारे क्लिनिक सुरू करण्यात यावेत.
प्रसंगी खाजगी डॉक्टर्स व हॉस्पीटलसच्या सेवा अधिग्रहीत करण्यात याव्यात. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता लक्षात घेवून आरोग्य उपसंचालकांमार्फत मालेगाव येथे प्रतिनियुक्तीने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भरती करण्याचे उपसंचालक यांचे अधिकार स्थानिक पातळीवरच आहेत, ते तसेच कायम ठेवण्यात आले आहेत.
त्यानुसार तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. गंभीर रूग्णांसाठी नाशिक व मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात यावी. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यात आपण यशस्वी होवू. 60 वर्षे वयाच्या मधुमेह व तत्सम आजारांच्या रुग्णांचेही सर्वेक्षण करण्यात यावेत. एका संसर्गित रूग्णासोबत 10 संशयित क्वारंटाइन करण्याची तयारी ठेवावी.
कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची स्वतंत्र टिम तयार करण्यात यावी, असेही यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मालेगाव येथील खाजगी रुग्णालयांचा सहभाग महत्त्वाचा : कृषीमंत्री दादाजी भुसे मालेगाव शहरातील 90 टक्के खाजगी रूग्णालये आज बंद असून त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांचे व कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार घेवू इच्छिणाऱ्या रूग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
त्यामुळे मालेगाव शहरातील खाजगी रूग्णालये व दवाखाने तात्काळ सुरू करण्यात यावीत. मालेगावच्या पश्चिम भागात वैद्यकीय सुविधा चांगल्या असून प्रादुर्भाव मात्र कमी आहे. ज्याठिकाणी प्रादुर्भाव जास्त आहे त्याठिकाणी वैद्यकीय सुविधा कमी आहेत. त्यामुळे त्याठिकाणच्या वैद्यकीय साधन सामुग्रीच्या बळकटीकरणावर भर देण्यात यावा,
असे यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. ते म्हणाले, कोरोनाच्या सर्वेक्षण करणाऱ्या टिमला मनोधैर्याबरोबरच सर्वेक्षणासाठी लागणारी साधन सामुग्री देण्याचीही गरज आहे. सध्या पोलीस यंत्रणेने दिलेल्या साधन सामुग्रीवर मालेगाव मधील आरोग्य पथके सर्वेक्षण करतांना दिसून येत आहेत,
असेही यावेळी कृषी मंत्री श्री.भुसे यांनी सांगितले. याबैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.