भंडारा : शेतकऱ्यांनी एकच पीक वारंवार घेतल्यामुळे शेतीची सुपिकता नाहीशी होत आहे. पीक घेतांना फेरबदल करणे गरजेचे आहे. जमीनीच्या सुपिकतेसह शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल अशा पिकांची निवड कृषी विभागाने करावी व शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले.
जिल्हा परिषद सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीपपूर्व हंगाम आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, खासदार सुनील मेंढे, आमदार राजु कारेमोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, सह संचालक कृषी भोसले यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
अनुभवाच्या आधारे व पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार बियाण्यांचे वाटप करावे. शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल यावर भर दयावा. देशात पूर्वी भंडारा जिल्ह्यातील जय श्रीराम वाणाच्या तांदळाची मागणी मोठया प्रमाणात होती.
ती कमी झाली आहे. आता त्याच दर्जाचे उत्पादकतेत वाढ करणारे दुसरे वाण शेतकऱ्यांना दिले तर त्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होऊन शेतकरी सधन होईल. एकरी उत्पन्न व चांगली गुणवत्ता असलेले बियाणे कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप करावे, असे केदार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना बियाण्यांची माहिती व्हावी यासाठी माहिती पत्रक, हँडबिल तयार करण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागाला केल्या. यामध्ये बियाणांचा कालावधी, एकरी उतारा, यांची सविस्तर माहिती दर्शवावी. नवीन व्हेरायटीचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करुन दाखवावे.
या प्रयोगाची आवण स्वतः पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या बियाण्याचे प्रात्यक्षिक सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दाखवावे असून सांगून याचा अहवाल कागदावर नाही तर प्रत्यक्ष जमीनीवर दिसला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
येणाऱ्या उन्हाळ्याची जाणीव ठेवून कार्यकारी अभियंत्यांनी सिंचन प्रस्ताव तात्काळ सादर करावा. प्रस्तावाचा पाठपूरावा शासनस्तरावर करण्यात येईल. क्रापिंग पॅटर्न वर्धा येथे राबविण्यात येत आहे.
त्यामुळे भरपूर उत्पन्न मिळते. वर्ध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय ठेवून त्याच धर्तीवर काम करावे. या क्रापिंग पॅटर्नचा प्रचार व प्रसार करुन समिती तयार करावी अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. यावेळी जमीन धारणा लाभ क्षेत्रात पाणाचे स्तोत्र, उन्हाळी धान, महाबीज, फळबाग लागवडीचा आढावा त्यांनी घेतला.
पाणी टंचाई आढावा बैठक
एप्रिल संपला असून उन्हाळा सुरू झाला आहे. जिल्ह्यात उन्हाळ्याची झळ ग्रामीण भागातील लोकांना जास्त बसते. ग्रामीण भागातील लोकांना पाणी मिळाले पाहिजे. पाणी टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील नळ योजना व विंधन विहीर नादुरुस्त असल्यास सर्वेक्षणाच्या कामास प्राधान्य देवून तात्काळ दुरुस्त कराव्यात.
जून पर्यंत सर्व कामे झाली पाहिजे त्यानुसार कामाची व्यवस्था करा. या कामाचे मॉनिटरिंग मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावे. जातीने लक्ष देऊन कामास गती द्यावी. उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी सर्व पंचायत समितीस्तरावर बैठकीचे आयोजन करुन परिस्थितीचे नियोजन करावे, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.
ग्रामीण भागातील नळ योजना व विहीर दुरुस्तीचे सर्व प्रस्ताव ताबडतोब शासनाकडे सादर करा. मंजूरीसाठी पाठपूरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले. गोबरवाही प्रादेशिक नळ योजनेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला असल्याचे खासदार सुनिल मेंढे व आमदार राजु कारेमोरे यांनी निदर्शनास आणून दिले.
सदर प्रस्ताव तात्काळ सादर करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या योजनेअंतर्गत २२ गावांना पाणी पुरवठा प्रस्तावित आहे. त्यापैकी १९ गावांना ही नळ योजना जोडली आहे. योजनेसाठी एजन्सी नेमा व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून पूर्ण अहवाल शासनाकडे सादर करा असे ते म्हणाले.
जिल्यातितील जीवन प्राधिकरणाकडे असलेल्या चारही नळ योजनेचा अहवाल सादर करावा, असे ते त्यांनी सांगितले. नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात पाणी टंचाई भासू नये यासाठी टँकरची व्यवस्था करावी. पाणी उपलब्ध प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करुन घ्यावे. त्याशिवाय मंजूरी मिळणार नाही, असे लाखांदूर नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी यांना सांगण्यात आले.
लाखांदूरसाठी नळ योजनेचा प्रस्ताव सादर करावा, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद अंतर्गत नळ योजनेच्या प्रस्तावासाठी सर्व सरपंचाची बैठक घ्या. सहकार्य व समन्वयातून योजना राबवा, असे ते म्हणाले.