संगमनेर :- मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जिल्ह्यात १२ विरुध्द ० असा निकाल लावण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधत थोरात यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
बदलती समीकरणे लक्षात घेता एकास एक उमेदवारीचा थोरात यांना फायदा होतो की तोटा हे निकालानंतर समोर येईल. विखेंचा ‘तगडा’ उमेदवार समजण्यासाठी आणखी चार दिवस जातील अशी चिन्हे आहे. आमदार थोरात यांना आत्तापर्यत मतविभागणीचा फायदा झाला, असे म्हटले जाते. विरोधी शिवसेनेच्या उमेदवारांना ४० ते ४४ हजार मते मिळत.
सर्वांच्या एकत्रित मतांची बेरीज थोरात यांच्या विजयाला कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. त्यामुळे यावेळी थोरात यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्यासाठी विखेंनी व्यूहरचना केली असली, तरी अशा एका २००४ च्या एकास एक लढतीत थोरातांना राज्यातील विक्रमी ७५७,५७ मताधिक्य मिळाले होते.
९० च्या बहुरंगी लढतीत मात्र अवघ्या ४८६२ मतांनी त्यांना विजय मिळाला होता. त्यामुळे यावेळची निवडणूक एकास एक होते की बहुरंगी, हे लवकरच स्पष्ट होईल. या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. विरोधकांना अद्याप शिरकाव करता आलेला नाही. थोरातांनी मंत्रिपदाच्या काळात ‘निळवंडे’ला चालना देत पाणीप्रश्न सोडवला.
२०१४ च्या मोदी लाटेत सत्तांतर झाल्यानंतर कालव्यांचा प्रश्न प्रलंबित राहिला. त्यामुळे त्याचे पाणी अद्याप लाभक्षेत्रात फिरु शकलेले नाही. नेमका हाच धागा पकडत यावेळी विखे यांनी सरकारने कालव्यांसाठी बाराशे काेटी दिल्याचे सांगत येत्या दीड वर्षात कालव्याचे काम पूर्ण होऊन पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे.