यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी भारतीय कापूस निगम (सीसीआय), कापूस पणन महासंघ (कॉटन फेडरेशन) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी करून कापूस खरेदीचा तिढा सोडविला आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व जिनिंगची बैठक घेऊन त्यांना कापूस खरेदीच्या सूचना केल्या. जिनिंगच्या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता जिल्ह्यात जिनिंगमध्ये कापूस खरेदी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
भारतीय कापूस निगमच्या अध्यक्ष पी. अल्ली इराणी यांच्यासह पालकमंत्र्यांनी पणनमंत्री, प्रधान सचिव, महाराष्ट्र कॉटन जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजपाल यांच्याशी संपर्क करून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील उपलब्ध असलेला सर्व कापूस खरेदी करण्याबाबत तात्काळ नियोजन करण्याचे संबंधितांना सूचित केले.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व खाजगी तसेच सहकारी जिनिंगचे मालक, भारतीय कापूस निगम, कापूस पणन महासंघ, जिल्हा उपनिबंधक व कृषी उत्पन्न बाजार समिती यांची बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व खाजगी जिनिंग मालकांनी, भारतीय कापूस निगम, कापूस पणन महासंघ व नॉन एफएक्यू कापसासाठी खाजगी बाजार समिती व खरेदीदार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
भारतीय कापूस निगमकडे एकूण 15 हजार 797 शेतकऱ्यांनी तर कापूस पणन महासंघाकडे 15 हजार 079 शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत नोंदणी केली आहे. जिल्ह्यामध्ये 6 लाख 12 हजार 598 क्विंटल कापूस आवक अपेक्षित असून भारतीय कापूस निगमकडे एकूण 3 लाख 56 हजार क्विंटल व कापूस पणन महासंघाकडे 2 लाख 56 हजार क्विंटल कापूस येण्याची शक्यता आहे.
3 लाख 50 हजार क्विंटल कापसापैकी किमान 20 खाजगी जिनिंग केंद्रावर दररोज 500 क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांकडे नॉन एफएक्यू कापूस असेल त्यांचा माल भारतीय कापूस निगम, कापूस पणन महासंघानी नाकारल्यास त्याच दिवशी खाजगी बाजार समित्या, खाजगी खरेदीदार किंवा खाजगी थेट परवानाधारक यांचेकडे खरेदी करण्यात येईल.
ज्या जिनिंग मालकाकडे किंवा मजुरांच्या वाहतुकीचा प्रश्न असेल त्यांनी त्यांच्या तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडून रितसर पासेस उपलब्ध करून घ्यावे. मजुरांच्या देखभालीची व आरोग्याची जबाबदारी जिनिंग मालकाची राहील.
त्यांनी फॅक्टरीमध्ये प्रत्येक व्यक्तीची रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी व कोव्हिड –19 याबाबत पूर्ण खबरदारी घ्यावी. अशा पध्दतीने 22 मे 2020 पर्यंत जिल्ह्यातील सर्व एफएक्यु व नॉन-एफएक्यू कापूस नोंदणी झालेल्यांना प्राधान्य देऊन खरेदी करण्यात येईल.
शासनाने 31 मे 2020 पर्यंत तूर व चना खरेदीची मुदतवाढ दिली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी व विदर्भ मार्केटिंग फेडरेशनमार्फत दररोज किमान 2500 क्विंटल तूर व 2500 क्विंटल चना खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण खरेदी दिनांक 31 मे 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले.