दिव्यांग कृष्णाकडून ‘खाऊचे पैसे’ मुख्यमंत्री सहायता निधीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

यवतमाळ, दि. 30 : कोरोना विरुध्दची लढाई शासन, प्रशासन, सर्व यंत्रणा, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आपल्या परीने लढत आहेत. या लढाईत प्रत्येक सुजाण नागरिक आपापल्या परीने शासनास मदत करीत आहेत.

यवतमाळमध्येसुध्दा एका दिव्यांग मुलाने वर्षभर जमविलेले ‘खाऊचे पैसे’ चक्क मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन आपला वाढदिवस साजरा केला.

येथील वडगाव रोड भागातील जयसिंगपुरे ले-आऊटमध्ये राहणारा कृष्णा विनोद राऊत (13) हा जन्मत: दिव्यांग आहे. बुधवारी 29 एप्रिल रोजी त्याचा 13 वा वाढदिवस होता.

मला कोणीही वाढदिवसाला काहीही भेट आणू नका तर कोरोनाची लढाई नेटाने लढणाऱ्या आपल्या मुख्यमंत्र्यांना मलाच ‘खाऊ’ भेट म्हणून द्यायचा आहे, असे त्याने सर्वांना सांगितले.

आपला वाढदिवस साजरा न करता वर्षभर गोळा केलेले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याची ही कल्पना त्याने आई, वडिलांना सांगितली. त्याचे वडील घरोघरी जाऊन हातगाडीवर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे.

हातावर पोट असलेल्या त्याच्या पालकांनीही मुलाच्या मताचा आदर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या खाऊचे पैसे असलेली ‘मनी बँक’ जशीच्या तशी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचे ठरवून राऊत कुटुंबीय थेट यवतमाळ तहसीलदारांकडे पोहोचले.

तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्याकडे कृष्णाने आपला ‘खाऊ’ मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला. ही बाब जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना कळताच त्यांनी कृष्णाला आपल्या कार्यालयात बोलवून घेतले. त्याची व कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली. यावेळी कृष्णाचे वडील विनोद राऊत हेसुध्दा उपस्थित होते.

जिल्ह्यातून सीएम आणि पीएम रिलीफ फंडकरीता 55 लाखांचा निधी जमा

कोरोनाच्या या लढाईत प्रत्येक जण शासनास मदत करीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहायता निधीकरिता आतापर्यंत 49 लक्ष 67 हजार 461 रुपये जमा करण्यात आले आहेत.

यात काही दानशूर व्यक्ती, विविध संघटना, पतसंस्था, प्रतिष्ठाने, लहान चिमुकले आदींचा समावेश आहे. 30 एप्रिलपर्यंत एकूण 49 जणांच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे सदर निधी जमा झाला आहे.

तर पंतप्रधान सहायता निधीकरिता एकूण 17 जणांच्या वतीने 5 लक्ष 51 हजार 311 रुपयांची मदत करण्यात आली आहे. सीएम आणि पीएम रिलिफ फंडकरिता जिल्ह्यातून एकूण 55 लक्ष 18 हजार 772 रुपये जमा झाले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24