उदयनराजेच बनणार राष्ट्रवादीचा चेहरा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सातारा :- निकालानंतर बदललेले खासदार उदयनराजे भोसलेंचे रुप सातारकरांना पहायला मिळाले आहे. राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर ‘पक्ष गेला खड्ड्यात,’ असे वक्तव्य करणाऱ्या उदयनराजेंनी खासदारकीची हॅटट्रिक केल्यानंतर अचानकपणे ‘यु टर्न’ घेतला आहे.

निवडणूक निकालानंतर गांभीर्याने वक्तव्ये करणे आणि ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानण्याचा कार्यक्रम सर्वांनाच चकित करुन टाकणारा आहे. कराड येेथे उदयनराजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे तर थेट शरद पवार यांनी कौतुक केले आहे.

शरद पवार यांनी अचानक केलेल्या दुष्काळ दौऱ्यात उदयनराजे यांना विशेष निरोप देवून त्यांनी बोलावून घेतले. पवारांनी उदयनराजेंशी गुप्तगुही केले. विधानसभा निवडणुकीसाठी लोकांना आकर्षित करेल, असा चेहरा नाही.

त्यामुळे लोकसभेत आणि पक्षात उदयनराजेंना लवकरच महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार असून त्यांचा पक्षवाढीसाठी राष्ट्रवादी पुरेपूर वापर करणार आहे.

मागच्या दोन लोकसभा निवडणुकीचा उदयनराजेंचा अनुभव वेगळा आहे. निवडणूक संपली की उदयनराजे कोणाचेही ऐकत नाहीत. एकूणच उदयनराजेंचा स्वभावच आक्रमक आहे. त्यांना जे पटेल तेच ते करतात. कोणाच्या सल्ल्याने आणि सांगण्याने करायची सवय त्यांना नाही.

त्यामुळे मागच्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीनंतर उदयनराजेंनी पक्ष, पक्षाचे आमदार आणि महत्त्वाच्या नेत्यांना वाऱ्यावर सोडले होते. पक्ष एकीकडे आणि उदयनराजे दुसरीकडे अशीच त्यांची वाटचाल राहिली आहे. गेल्या दहा वर्षांत उदयनराजे नावालाच राष्ट्रवादीचे राहिले होते.

त्यांची सगळी ताकद विरोधी पक्षालाच मिळत होती. मात्र यंदाची लोकसभेची निवडणूक त्यांनी गांभीर्याने लढवली. निवडणुकीच्या काळात तर तब्बल एक महिना ते अगदी दोन ते तीन तासच झोपायचे. तीन तासाच्या झोपेनंतर तब्बल २१ तास त्यांचा मुड फ्रेश असायचा.

निवडणूक असल्याने उदयनराजे मतदानापर्यंत असेच वागतील आणि पुन्हा ‘पहिले पाढे पंच्चावन’ अशी परिस्थिती राहिल. निकालानंतर तर उदयनराजेंची प्रतिक्रिया काय असेल याचा अंदाज व्यक्त करणेही कठीण जात होते.

मात्र निवडणूक निकाल लागला आणि सगळी परिस्थिती बदललेली पहायला मिळाली. उदयनराजे यांनी आपली संपूर्ण स्टाईल आणि रणनितीच बदलली असून त्याचा जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणावर फार मोठे परिणाम झालेले पहायला मिळतील.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24