भर पावसात सभा घेण्याची वेळ नसती आली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सातारा : आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुष्काळी भागातील पाणी योजना पूर्ण केल्या असत्या आणि दुष्काळी भागाला जीवनदायी ठरणाऱ्या पाणी योजनांमध्ये ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला नसता, तर त्यांना आज भरपावसात सभा घेण्याची वेळच आली नसती.

मतदारांनी त्यांना घरी बसूनच मते देऊन निवडून दिले असते, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांचे नाव न घेता दिला आहे. माण तालुक्यातील दहिवडी येथे उध्दव ठाकरे यांनी माण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारसभेत दोन्ही कॉंग्रेसवर टीका केली.

यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या वतीने मी महाराष्ट्रातील नागरिकांना वचननामा दिला आहे. त्यातील प्रत्येक शब्दाला मी वचनबध्द असून माझ्या गोरगरीब नागरिकांना दहा रुपयांत जेवण, एक रुपयात आरोग्य चाचणी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणार आहे.

शिवसेना मित्राची भूमिका चांगल्या पध्दतीने निभावते. म्हणूनच आम्ही भाजपाला डीएनए बदलणाऱ्याला घेऊ नका, असे सांगत होतो. मात्र त्यांनी नाही ऐकले. तीच परिस्थिती कणकवलीतही केली. आपले काम आहे, मित्राचे चांगले पाहणे, पण त्यांना ते समजेना.

तुमचं वाईट होईल म्हणून आम्ही सांगत होतो. मराठा, धनगर, माळीसह सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारी शिवसेना आहे. मराठा समाजाच्या मागे जशी शिवसेना उभी आहे, तशीच धनगर समाज व इतर समाजाच्या पाठीशी शिवसेना उभी असल्याचे उध्दव ठाकरेंनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24