मुंबई : भाजपासोबतच्या युतीचे ठरले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चांगली चर्चा सुरू आहे. एक-दोन दिवसांत त्याबाबत जाहीरही करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पण त्याचवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या अखेरच्या दिवसांत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनवणार, असे वचन मी दिले आहे.
त्यांना दिलेले हे वचन मी पूर्ण करणारच, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी जो कर्माने मरणार आहे, त्याला धर्माने मारू नका, अशी शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. जो सुडाने वागतो त्यावर महाराष्ट्र आसूड ओढल्याशिवाय राहत नाही, असेही त्यांनी सुनावले.
रंगशारदा सभागृहात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीला शनिवारी संबोधित करताना ते बोलत होते. विशेष म्हणजे या वेळी विधानसभेच्या सर्व म्हणजे २८८ मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांनाही बोलावण्यात आले होते.
मात्र, २८८ मतदारसंघांतील इच्छुकांना बोलावले म्हणजे युती होणार नाही, असे नाही, असे स्पष्ट करून उद्धव ठाकरे म्हणाले.’कर्माने मरणाऱ्याला धर्माने मारायचे नसते’ अशी शिवसेनाप्रमुखांची शिकवण असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, पवार कुटुंबाच्या कौटुंबिक भांडणात आम्हाला आनंद नाही.
शिवसेनेसोबत कोणी वाईट वागले तरी त्यांचे कधी वाईट व्हावे, अशी कधी इच्छा केली नाही.महाराष्ट्र कधीही कोणी सुडाने वागलेले पसंत करत नाही. कोणी सूड उगवण्याचा प्रयत्न केला तर आसूड उगारतो. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी त्यांना सांगितले होते.
काँग्रेस किंवा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कधी लाठीचार्ज करू नका, कारण विरोधी पक्षात असली तरी ती आपल्या महाराष्ट्रातीलच मुले आहेत. कालसारखा प्रसंग कधी तरी आमच्यावरही आला होता. शिवसेनाप्रमुखांना अटक झाली होती.
तेव्हा सरकार कोणाचे होते? पण त्या वेळी कोणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नव्हता. आमच्या मदतीला तेव्हा कोणी आले नव्हते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.