पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे हे इंड्ट्रिरअल मॅग्नेट असून, पुण्यात सर्वांत जास्त रोजगारनिर्मिती केली असल्याचा दावा केला.
आपण सरकारने केलेली रोजगारनिर्मिती, नवे प्रकल्प, त्यातील गुंतवणूक आदी माहिती वेळोवेळी मागवली; मात्र ती देण्यात आली नाही. नुकतेच माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सन २०१४ ते २०१८ या कालावधीत पुण्यात अवघ्या २० हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.
यामुळे फक्त भूलथापा मारण्यापेक्षा, तसेच पक्षात मेगाभरती करण्यापेक्षा रोजगारात मेगाभरती करा, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (दि. १५) पिंपरी येथे केली.
एका कार्यक्रमानिमित्त चव्हाण पिंपरी-चिंचवडमध्ये आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. चव्हाण म्हणाले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार मोदी सरकारच्या काळात ७३ हजार कोटींचे घोटाळे झाले.
या घोटाळ्यांचे आश्रयदाते कोण, याचीही माहिती देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. . मुख्यमंत्री फडणवीस हे मोठ्याप्रमाणात रोजगारनिर्मिती झाल्याचे सांगत असतात.
मात्र, गेल्या चार वर्षांत किती प्रकल्प राबवले, किती गुंतवणूक केली, किती उद्योजकांना फायदा मिळाला, किती उद्योग सुरू झाला आणि किती नागरिकांना रोजगार मिळाला याची जिल्हानिहाय माहिती मी सरकारकडे मागत आहे. मात्र, ती माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
तसेच माहिती अधिकारातही त्रोटक माहिती दिली जात आहे. सुदैवाने माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार मागील चार वर्षांत पुण्यामध्ये केवळ २० हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. मुख्यमंत्री पुण्यात सर्वांत जास्त रोजगार आणल्याचे सांगत आहेत.
यामुळे जर पुण्यात रोजगाराचे हे आकडे असतील, तर इतर शहरात किती रोजगार आला असेल, याची कल्पना करवत नाही. ऑटो सेक्टरमधील साडेतीन लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सरकारने योग्य पावले टाकले नाहीत, तर दहा लाख लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. त्यात पुणे अग्रस्थानी आहे. यामुळे सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरल्याची टीका त्यांनी या वेळी केली.