मुंबई : महाराष्ट्राने औद्योगिक राज्य म्हणून पहिला क्रमांक पुन्हा मिळवला आहे. देशातील औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर देशातील थेट विदेशी गुंतवणुकीतही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
नीती आयोग व रिझर्व्ह बँकेने घोषित केल्याप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्रच आहे. राज्यात मागील पाच वर्षांत ५९ लाख ४२ हजार रोजगार निर्मिती झाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
राज्यात स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी व रोजगार निर्मिती करण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना आखली आहे.
वरळी येथील एनएससीआयच्या डोममध्ये आयोजित केलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अतुल सावे, उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
२०१४ पूर्वीच्या पाच वर्षांत एकूणच औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट होत होती. पण, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राने औद्योगिक राज्य म्हणून आपला पहिला क्रमांक पुन्हा मिळवला. देशातील औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात थेट परकीय गुंतवणुकीत जर गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहिली तर चार राज्यांमधील एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.