राज ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतली भेट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज्यातील अस्थिर राजकीय पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.

शनिवारी संध्याकाळी राज ठाकरे यांनी ही भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. चर्चेचा तपशील गुलदस्त्यात असला तरी दोघांमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाली असणार हे उघड आहे. निकालानंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच ही भेट झाली आहे. निकालानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

विधानसभा निवडणुकांत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने परस्परपूरक भूमिका घेतली होती. निवडणुकांआधी मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. मात्र, काँग्रेसने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

आता भविष्यात जर भाजपाची कोंडी करायची असेल, तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे, असेच चित्र विधानसभा निकालांतून दिसून आले आहे.

कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील हे एकमेव आमदार निवडून आले असले तरी राज्याच्या राजकारणात मनसेला बेदखल करून चालणार नाही. तसेच भाजपा आणि शिवसेनेत सत्तास्थापनेची अद्याप चर्चादेखील सुरू झालेली नाही. भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशा समीकरणाचीही चर्चा सुरू आहे.

अहमदनगर लाईव्ह 24