मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मातोश्री बंगल्यावर सेनेचे पदाधिकारी, संपर्क व विभागप्रमुख यांचे म्हणणे रविवारी जाणून घेतले. युतीची बोलणी चालू असतानाच शिवसेनेने २८८ मतदारसंघांतील परिस्थितीची रविवारी चाचपणी घेतली.
जागावाटप तोडग्याच्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नसल्यामुळे वेट अँड वॉच या भूमिकेतून शिवसेनेने आपल्या नेत्यांना या बैठकीत सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मातोश्री निवासस्थानी रविवारी बैठक चालू असतानाच शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या. मतदारसंघातील राजकीय परिस्थिती उद्धव यांनी जाणून घेतली.
युतीच्या जागावाटपात काही मतदारसंघांची अदलाबदल झाली तर काय चित्र राहील, याचा अंदाज या बैठकीत घेण्यात आल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात पक्षप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आढावा घेत असतात.
त्याचाच हा भाग होता. हा आढावा असून चाचपणी नाही, असे आमदार संजय पोतनीस यांनी सांगितले. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश असून, शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे, असे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.