अहमदनगर :- टीक-टॉक व्हिडिओ पाहून हसल्याचा राग आल्याने नगर महाविद्यालयात एकास कोयत्याचा धाक दाखवून लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
१६ जुलै रोजी ही घटना घडली असून तब्बल १५ दिवसांनी ३ ऑगस्टरोजी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीरिझा शौकती (वय १८) असे फिर्यादीचे नाव असून, आकाश कोरे, अबरार शेख आणि त्याचे दोन मित्रांवर या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नगर महाविद्यालयाच्या ग्रंथालयासमोरील परिसरात मोबाईलमध्ये टीक-टॉक व्हिडिओ पाहात असतांना हसल्याचा राग येवून आकाश, अबरार आणि त्याच्या आणखी दोन मित्रांनी अलीरिझा आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
अलीरिझा हा तेथून पळून जात असताना या चौघांनी त्याला रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कोतवाली पोलिसांत कलम ३४१, २३२, ५०४, ५०६, ३४ सह आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल शकील शेख अधिक तपास करीत आहेत.