उड्डाणपूल आणि बाह्यवळण मार्गामुळे शहर व जिल्हा विकासाला चालना- नितीन गडकरी.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :-  नगर शहरातील उड्डाणपूल आणि बाह्यवळण मार्गाच्या कामांमुळे तसेच जिल्ह्यात होणार्‍या विविध १३ हजार कोटी रुपयांच्या कामांमुळे विकासाचा वेग वाढेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाजबांधणी व नदी विकासस जलसंधारण व गंगा शुद्धीकरणमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नगर शहरातील ३.०८ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाचे काम आणि अहमदनगर बाह्यवळण रस्त्याचे ४०.६०० किमी. चौपदरीकरणाच्या कामांचा कोनशीला समारंभ व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून श्री. गडकरी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

नगर शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ मार्केटयार्ड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार बबनराव पाचपुते, महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपमहापौर मालन ढोणे, हस्तीमल मुनोत, रस्ते महामार्ग विकास प्राधीकरणाचे अहमदनगरचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, सोलापूर येथील प्रकल्प संचालक संजय कदम आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी श्री. गडकरी यांनी नगर-शिर्डी सहा पदरी, नगर-पुणे आठ पदरीू, नगर-औरंगाबाद आठ पदरी, नगर-काष्टी-दौंड चार पदरी, सुरत-नाशिक-नगर सहा पदरी (न्यू ग्रीन फील्ड रोड) आणि अहमदनगर-जामखेड दोन पदरी या १३ हजार ६०० कोटी रुपयांच्या नवीन कामांचीही लवकर सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्ष श्री. औटी यांनी या विकासकामांसाठी भरीव निधी दिल्यामुळे दर्जेदार कामे जिल्ह्यात होतील असे सांगितले. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी शहर व जिल्ह्यासाठी प्राप्त झाला नव्हता, असेही ते म्हणाले. खासदार गांधी यांनी शहर व जिल्हा विकासासाठी आणि खासकरुन रस्ते विकासांच्या कामांसाठी केंद्रीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले.

सध्या राहुरी-शनिशंगणापूर, नगर-काष्टी-दौंड-बारामती, अहमदनगर ते खरवंडी कासार आणि नगर ते करमाळा चौपदरी रस्त्यांची कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. कर्डीले आणि श्री. पाचपुते तसेच महापौर वाकळे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24