आम्हाला मतदान करा घरे बांधून देतो – खा.सुजय विखेंचे पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- विधानसभा निवडणुका जवळ येताच खा.डॉ सुजय विखे चर्चेत रहाण्याच्या प्रयत्नांत दिसत आहेत. वादग्रस्त विधाने करून माध्यमांसह जनतेच लक्ष वेधून घेण्याचे काम ते करताना दिसत आहेत 

अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावरील आक्षेपार्ह विधान त्यानंतर वीस वर्ष मीच दक्षिणेचा खासदार रहाणार असल्याच्या वक्तव्यानंतर उत्तरेचा खासदार ही मीच आहे असे विधान त्यांनी जाहीर कार्यक्रमात केले आहे.

याच कार्यक्रमात चक्क मतदारांना आवाहन करताना आम्हाला मतदान करा, घरे बांधून देतो आणि त्यासाठी कोणत्या सरकारी योजनेची ही गरज नसेल असे वक्तव्य करत एक प्रकारे मतदारांना आमिष खा.डॉ सुजय विखे यांनी दाखवले आहे.

राहाता तालुक्यात साकुरी येथे खासदार विखे यांच्या हस्ते ६ कोटी ४५ लाखांच्या विविध विकासकामांना प्रारंभ झाला.यावेळी बोलताना खासदार विखे म्हणाले की, साकुरीतील जनतेने या आधी खूप राजकीय संघर्ष पाहिले आहेत. 

तालुक्यातील सर्वच गावांतील २० हजार गरजू कुटुंबीयांना शिधापत्रिकेचे वाटप, गरजूंना शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने देण्याचे काम मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कोट्यवधींची विकासकामे केली.

विखे कुटुंबीयांवर कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नसल्यामुळे भाजपाने राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद दिल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आम्ही सांगू तोच उमेदवार द्यावा.

त्याला आम्ही निवडून आणू. खासदार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणले. परंतु उत्तरेचाही खासदार मीच आहे, असे समजून हक्काने कामे सांगा.

मतभेद बाजूला ठेवून राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून द्या. ज्या गावात विखे यांना ८० टक्के मतदान होईल, तेथील गरजूंना घर बांधून देण्याचे काम आमचे असेल. त्यासाठी शासन योजनेची गरजही नाही.

दरम्यान आता या वक्तव्यामुळे खा.डॉ सुजय विखे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24