भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणतात रोहित पवारांच्या कामाने मी प्रभावित झालो!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड :- पंचायत समितीच्या विद्यमान उपसभापती राजश्री सूर्यकांत मोरे यांचे पती व भाजप जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी नुकतेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात बंड पुकारून भाजपला सोडचिठ्ठी दिली.

तसेच ते येत्या २३ तारखेला कर्जत येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी सरपंच दादासाहेब वारे, संतोष कात्रजकर, देवदैठणचे सरपंच अनिल भोरे, शरद मोरे, सरपंच शांतीलाल खैरे, नानासाहेब भोरे, अशोक ढमढेरे प्रसन्न कात्रजकर, दिलीप कवादे दत्तात्रेय वारे चंद्रशेखर मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी मोरे म्हणाले, अडचणीच्या काळात पालकमंत्री प्रा राम शिंदे यांना मी खूप मदत केली. पण ज्यावेळी राम शिंदे मंत्री झाले त्यावेळी त्यांच्या डोक्यात मंत्री पदाची हवा शिरली व ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विसरले.

मंत्र्याची कामे पीए गोरख घनवट करतात अन् पीएच कोट्यवधी रुपयांचे मालक झाले आहेत. निष्ठावान कार्यकर्ते घोंगड्या उचलण्याचेच काम करत आहेत. पीए विरोधात पालकमंत्री प्रा राम शिंदे हे कसलीही तक्रार ऐकून घेत नाहीत.

तीसरी नापास आसलेल्या पी ए कडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आली कोठून असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला. कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या रोहित पवार करत असलेल्या सामाजिक कामावर मी प्रभावीत झालो आहे.

त्यांच्याकडे अनेक तरुण अकर्षीत होत आहेत. त्यामुळे मी देखील २३ रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24