मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची भेट झाली असून दोघांमध्ये बंद दाराच्या आड चर्चा झाली. या वेळी समीर भुजबळही उपस्थित होते. छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी भुजबळ यांची मनधरणी केल्याचे समजते. मात्र जागावाटपाबाबत आपण शरद पवारांशी चर्चा केल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला लगलेल्या मेगागळतीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांसारख्या पक्षाच्या पहिल्या फळीतल्या नेत्याने पक्ष सोडल्यास तो पक्षाला मोठा धक्का असणार आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ व समीर भुजबळ यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीला महत्व आले आहे.
बंद दाराआड ही चर्चा झाल्याने चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही.जागावाटपाबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. मनधरणी वगैरे कोणाचीही केली जात नाही. ज्याला जायचे ते जातील. एक गेला तर इतर अनेक उमेदवार लढायला तयार आहेत.
राजा गेला, जायला नको होता पण गेला, तरी प्रजा आमच्यासोबतच आहे. साताऱ्याचा किल्ला आमचाच असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी छ. उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशावर दिली.