अहमदनगर : केंद्र सरकारच्या योजना जनसामान्यांच्या पर्यंत थेट पोहोचाव्यात विविध योजनांची माहिती सुलभ रीतीने नागरिकांना मिळावी, तसेच अडचणींचे गाऱ्हाणे नागरिकांना लोकसभा सदस्याकडे मांडता यावे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळापासून प्रत्येक लोकसभा सदस्यासाठी खासदार सुविधा केंद्राची संकल्पना पुढे आली.
याच संदर्भात खासदार सुविधा केंद्राबाबत सदाशिव लोखंडे यांनी पुढाकार घेतला असून, खासदार सुविधा केंद्रासाठी प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी खा. लोखंडे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.
खासदार सुविधा केंद्रासाठी सरकारी जागा संबंधित लोकसभा सदस्याला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. देशात नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अनेक लोकसभा सदस्यांची खासदार सुविधा केंद्रे अस्तित्वात आली होती.
मागील पंचवार्षिकमध्ये शिर्डी मतदारसंघातून खासदार लोखंडे यांनी लोकसभेवर पहिल्यांदाच प्रतिनिधित्व केले. मात्र, मागीलवेळी नगर दक्षिणेतून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणारे खासदार दिलीप गांधी यांनी खासदार सुविधा केंद्र निर्माण केले. खासदार गांधी यांनी खासदार सुविधा केंद्रासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यासाठी त्यांना आयटीआय नजीक सरकारी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.
मात्र, शिर्डीतून लोकसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या लोखंडे यांचे खासदार सुविधा केंद्र काही कारणामुळे अस्तित्वात येऊ शकले नाही. आता नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर खासदार लोखंडे दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले आहेत.
यावेळी जिल्हाभरातून नागरिकांच्या शंका समाधानासाठी व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी खासदार सुविधा केंद्रासाठी खासदार लोखंडे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. याच संदर्भात काल सोमवार रोजी लोखंडे यांनी प्रशासनाकडे खासदार सुविधा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.