अहमदनगर : जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत भूजल पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. जिल्ह्यातील १ हजार ६०२ गावांना येत्या ३१ मार्चअखेर टंचाईची झळ बसणार नाही.
या संदर्भात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील पंधराशे सत्तावीस निरीक्षण विहिरींच्या १५ ऑक्टॉबर दरम्यान नोंदी घेण्यात आल्या होत्या.
यासाठी प्रशिक्षित जलसुरक्षक नियुक्त करण्यात आले होते. आता यासंदर्भातील भूजल सर्वेक्षणचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात जिल्ह्याच्या शिवारावर घोंगावणारे टंचाईचे मळभ येत्या मार्चपावेतो हटल्याचे आशादायी संकेत समोर आले आहेत.
दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर अशा महिन्यांमध्ये भूजल पातळीची नोंद केली जाते. जिल्ह्याच्या पाणीपातळीच्या अद्ययावत नोंदी भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेमार्फत घेतल्या जातात. यासाठी मागील वर्षापर्यंत जिल्हाभरात २०२ विहिरी निश्चित करण्यात आल्या होत्या.
मात्र भूजल पातळीची नोंद अचूक प्राप्त व्हावी व हे काम अधिक सूत्रबद्ध स्वरुपात व्हावे, यासाठी यंदा विहिरींची संख्या तब्बल १ हजार ३०० ने वाढविण्यात आली. जिल्ह्यातील १ हजार ६०२ गावांतील १ हजार ५२७ निरीक्षण विहिरींतील पाणीपातळी घेण्याचे नियोजन भूजल यंत्रणेने केले.
त्यासाठी ग्रामस्तरावर नेमण्यात आलेल्या जलसुरक्षकांची मदत घेतली गेली. या सर्व जलसुरक्षकांना पाणी पातळी कशी मोजावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाच्या कर्जत, नगर, पाथर्डी, राहाता, संगमनेर व श्रीरामपूर या सहा उपविभागीय प्रयोगशाळांवर जबाबदारी देण्यात आली होती. त्याकरिता त्यांना मोजमाप करण्यासाठी टेप व नोंदवही दिली होती.
३० सप्टेंबरच्या मुदतीत जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींची नोंद घेण्यात आली. त्यात कर्जत जामखेड व पाथर्डी या तीन तालुक्यांतील पाणीपातळीत घट आढळून आली. दरम्यान सप्टेंबरनंतर परतीचा पाऊस जिल्ह्यात धुवांधार बरसला. मागील १२ वर्षांची तुलनात्मक आकडेवारी विचारात घेता जिल्ह्यात अखेरच्या टप्प्यात सरासरी २०० मि. मी. असा विक्रमी पाऊस झाला.
त्यामुळे १५ ऑक्टोबर दरम्यान भूजल यंत्रणेद्वारे पुन्हा जलसुरक्षकांकडून जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींची माहिती घेण्यात आली. त्यानुसार जिल्ह्याच्या पाणी पातळीत सर्वत्र समाधानकारक वाढ झाल्याचे निष्पन्न होत आहे.
तालुकानिहाय निरीक्षण विहिरी.
अकोले -१७८, संगमनेर – १६५, पारनेर -१३१, पाथर्डी- १२७, नेवासा – १२७, कर्जत-१२०, श्रीगोंदा -१११, नगर -११०, शेवगाव-९६, राहुरी – ९१, जामखेड -७७, कोपरगाव -७७, राहाता -६०, श्रीरामपूर – ५७.