माझं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

बीड : अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही हे मला ठाऊक आहे. मात्र, माझं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील परभणी फाट्यावर दिली. 

दरम्यान, ठाकरे यांच्या प्रतीक्षेत दोन तास कार्यकर्ते व शेतकरी रस्त्यावर ताटकळले होते. उद्धव ठाकरे हे परळी येथे पीक पाहणी करून माजलगावात दाखल झाले. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा माजलगावातील दौरा नियोजित होता; परंतु त्यांचा ताफा रात्री साडेआठ वाजता येथील परभणी फाट्यावर पोहोचला. 

पीक पाहणी केली, अतिशय वाईट स्थिती आहे. अटी, शर्थी न लावता हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी आपण केली असून अखेरपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
शेतकरी मर्द आहेत, ते अशा संकटांना घाबरणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी धीर दिला. कर्जमाफीचा लाभ मिळाला का? नाही ना? असा सवाल करून त्यांनी मला खरी परिस्थिती माहीत आहे, असे सांगितले.

 शिवसेनेचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे, असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. बँकांच्या कर्ज वसुलीच्या नोटीसकडे दुर्लक्ष करा, शिवसैनिक शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढेल, असे ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24