मुंबई: पुढचं सरकार भाजपचंच असेल, असा विश्वास काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच आम्ही कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, असंही ते म्हणाले.
अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं कधीही ठरलं नव्हतं, तसंच एकदा या फॉर्म्युलामुळे बोलणी फिस्कटली होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझे फोन उचचले नाहीत,असेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरही टीका केली. मागच्या काही दिवसांमध्ये आणि मागच्या 5 वर्षांमध्ये शिवसेना नेत्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहूनही सर्वोच्च नेत्यावर टीका करणं चुकीचं आहे.
अशाप्रकारची टीका विरोधकांनीही केली नसल्याचं फडणवीस म्हणाले. तुमच्या टीकेला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, पण आम्ही तशी टीका करणार नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.