मुंबई : भाजपा हा सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी राज्यपालांची निश्चितच भेट घ्यावी. बहुमतासाठी ते निश्चितच १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करतील, अशी अपेक्षा आहे.
मात्र काहीही झाले तरी महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, हीच गोड बातमी सुधीर मुनगंटीवार देणार असल्याचेही राऊत म्हणाले. भाजपाने अद्यापि तरी कोणताही प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी गुरुवारी राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांनीच राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करावा, असे मी आधीच म्हणालो होतो.